दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
हिंगोली (Hingoli Crime) : शहरासह परिसरात २३ नोव्हेंबरला दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाण प्रकरणात पोलिसांनी ११ आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात २३ नोव्हेंबरला आसराजी उर्फ पप्पू सुरेश चव्हाण याने हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत चेतन सुदाम नागरे, अजय सुदाम नागरे, गोपाल बांगर, करण बांगर, लखन चौधरी, सांगळे व इतर ६० ते ७० जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पप्पू चव्हाण यास लाथा बुक्याने मारहाण करून पिस्टल काढून धमकी दिल्यानंतर चव्हाण यांच्या चार चाकी वाहनाची बळसोंड येथील निवासस्थानी तोडफोड करून त्याच्या भावास गंभीर मारहाण (Hingoli Crime) केल्याचा उल्लेख तक्रारीत केला होता. यामध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून श्रीकांत गोलू बळीराम बांगर रा.हिंगोली, ऋषिकेश गणेश जगताप रा.बोरजा, हनुमान अशोक तारे, वैभव ज्ञानेश्वर तारे, विशाल ज्ञानेश्वर तारे रा.सवड यांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
त्याचा तपास हिंगोली शहर ठाण्याचे सपोनि जाधव हे करीत आहेत. तसेच २४ नोव्हेंबरला विशाल रामा आठवले रा.खडकपुरा हिंगोली याने हिंगोली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. ज्यामध्ये पप्पू चव्हाण, अमोल देशमुख, विवेक देशमुख, राजू जोजार, विकास जोजार, केशव तनपूरे या आरोपींनी विशालला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या संदर्भात विचारणा करण्यासाठी चव्हाण यांच्या बळसोंड येथील घरी गेले असता त्यास कोयता, रॉडने मारून गंभीर जखमी केले. (Hingoli Crime) तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने गौरव बांगर याच्या पोटात गोळी मारली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे हे करीत आहेत.