Published on
:
25 Nov 2024, 4:58 pm
Updated on
:
25 Nov 2024, 4:58 pm
नवी दिल्ली: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा होत्या. मात्र दिल्ली दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी या चर्चा फेटाळल्या. मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी मल्लिकार्जुन खर्गे आणि नाना पटोले यांची आज बैठक झाली. जवळ जवळ ४५ मिनिटे ही बैठक चालली. दरम्यान, काँग्रेस मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.
या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले की, 'महाराष्ट्र विधानसभेचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला अनपेक्षित आहे. या निकालाबद्दल आमची चर्चा झाली. सोबतच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही या निकालाबद्दल चर्चा झाली. आम्ही सगळे कार्यकर्ते ताकदीने विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलो होतो. पक्षाध्यक्ष खर्गे यांनाही अनपेक्षित हा निकाल आहे. असे असले तरी यापुढेही काँग्रेस पक्ष जनतेची भूमिका घेऊन लढणार आहे, असेही ते म्हणाले.
नाना पटोलेंनी राजीनामा दिला पण...?
रविवारपासून नाना पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा रविवारीच संध्याकाळी पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे. मात्र या संदर्भात मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्याशी त्यांची एकत्र सविस्तर चर्चा होण्यास आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर आणखी निर्णय झालेला नाही. सोबतच नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारल्यास प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवावी, याचाही विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठींना करावा लागणार आहे. विविध मतदारसंघातून काँग्रेसचे प्रमुख नेते पराभूत झाल्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष कोण याचाही विचार काँग्रेसला करावा लागणार आहे. त्यामुळे तूर्तास नाना पटोले यांना काँग्रेसने अभय दिले आहे.