Published on
:
25 Nov 2024, 5:01 pm
Updated on
:
25 Nov 2024, 5:01 pm
पनवेल : महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका २४ वर्षीय इंजिनिअर ने चक्क चोरी केल्याची घटना पनवेल मध्ये घडल्याचे समोर आले आहे. चोरी करणाऱ्या २४ वर्षीय इंजिनिअर आरोपीला पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने अटक करून गजाआड केले आहे. आरोपी कडून पोलिसांनी २४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आकाश राजाराम वळकुंडे वय २४ राहणार उरण कुंडेगाव, असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश उरण मध्ये आपल्या आई आणि बहिणी सोबत राहत होता. सध्या आकाश इलेक्ट्रॉनिक इजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षात नवी मुंबई परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे धडे गिरवत होता. मात्र हे धडे गिरवताना आकाशचा निर्णय चुकला आणि आकाश पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सध्या आकाश वळकुंडे हा गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.
पोलिसांनी आकाशाला चोरी प्रकरणी अटक केली आहे. पनवेल शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात आकाशने चोरी केली होती. १९ डिसेंबर च्या पहाटे पनवेल शहराच्या मध्यभागी असलेल्या मोबाईल शॉप मध्ये चोरी करून अज्ञात आरोपीने लाखो रुपयांच्या मोबाईल वर डल्ला मारल्याची घटना १९ डिसेंबर ला उघड झाली होती. ही चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अज्ञात आरोपी विरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. गुन्हा दाखल झाल्या नंतर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल नवी मुंबई पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्याकडे गेल्या नंतर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे , मानसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, देसाई, पोलिस कर्मचारी प्रशांत काटकर, अनिल पाटील, निलेश पाटील, इंद्रजीत कानू, लवकुश शिंगाडे, आदिनाथ कुंडे या पोलिस पथकाने तपासाला सुरवात केली.
पोलिसांनी मोबाईल शॉप तसेच आजुबाजूच्या परिसरातील फुटेज पाहून आरोपीच्या तांत्रिकदृष्ट्या तपासाला सुरवात केली. २० नोव्हेंबर रोजी पोलिस पथकाला आरोपीच्या काही गोष्टीची माहीती मिळाली. यानंतर गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल नवी मुंबईच्या पोलिस पथकाने आरोपीला अटक करण्याची तयारी सुरू केली. आरोपी हा उरण परिसरातील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपीला पोलिस पथकाने २१ नोव्हेंबर रोजी पहाटे बेलापूर येथून अटक केली. बेलापूर येथून अटक केल्या नंतर घटनास्थळी आरोपीची तपासणी केली असता आरोपी कडून पोलिसांना मोबाईल मिळाले. हे मोबाईल कोणाचे आहेत, याची चौकशी केल्यानंतर हे मोबाईल चोरीचे असल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपी आकाश याची अधिक चौकशी केली असता आकाश हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग च्या तिसऱ्या वर्षाला असल्याची माहिती मिळाली हे ऐकून पोलिस देखील थक्क झाले ,त्या सोबत ही चोरी का केली याची विचारणा केली असता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याची माहिती आकाशने पोलिसानी दिली. पोलिसांनी आरोपी कडून लाखो रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
मोबाईल विक्रीसाठी गाठले गाव
आरोपी आकाश हा उरण येथे त्याच्या आई आणि बहिणी सोबत राहत होता. १९ तारखेला चोरी केल्या नंतर आरोपीने मोबाईल घेऊन थेट, त्याचे मूळ गाव असलेले सांगोला तालुका गाठला आणि मोबाईल विकण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र मोबाईल काही विकले गेले नाही.त्यामुळे आकाश पुन्हा नवी मुंबईत मोबाईल घेऊन आला. त्याच वेळी आकाशला पोलिसांनी मोबाईल सह अटक केली.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या आकाश ने मोबाईल च्या दुकानात का चोरी केली असावी असा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे. घरची परिस्थिती बेताची असताना देखील आकाश ने हे पाऊल का उचलले हा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडला आहे.