Published on
:
25 Nov 2024, 5:08 pm
Updated on
:
25 Nov 2024, 5:08 pm
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वांच्याच ओठावर होती. सत्ताधारी पक्षाचे खासदार एकमेकांचे अभिनंदन करत असतानाच विरोधी पक्षातील खासदारांनी निकालावर आश्चर्य व्यक्त केले. विरोधी पक्षाच्या खासदारांशी निकालाबाबत चर्चा केली असता ते एवढेच म्हणाले की, तुम्हाला अशा निकालाची अपेक्षा होती का? नाही, आता यात काय बोलायचं राहिलं ते तुम्हीच सांगा अशी प्रतिक्रिया खासदारांनी दिली. पराभव हा वेगळा मुद्दा आहे, पण ज्या प्रकारचे निकाल आले आहेत, त्यात सत्ताधारी पक्षांनाही अपेक्षा नव्हती, असा सूर विरोधी पक्षाच्या खासदारांचा पाहायला मिळाला.
शरद पवारांची आज संसदेत अनुपस्थिती
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाबाबत संसदेत बरीच चर्चा झाली. या दोन्ही पक्षांचे भवितव्य काय असणार, याबाबत सर्वच पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यांच्या भवितव्याबद्दल काँग्रेसलाही साशंकता वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा विश्वास एका काँग्रेसच्या खासदाराने व्यक्त केला. आता शरद पवार पक्षाला संजीवनी देण्याच्या स्थितीत नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी शरद पवार उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत खासदारांचेही असेच मत दिसत आहे. शिवसेनेचे बहुतांश नेते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील, असा विश्वास भाजपच्या बहुतांश खासदारांना वाटत आहे. यातील काही जण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. एक-दोन नेतेही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट पुन्हा अडचणी येण्याची शक्यता आहे.
प्रियांका गांधी आणि रवींद्र चव्हाण यांनी आज शपथ घेतली नाही
वायनाडमधून लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियंका गांधी आणि नांदेडमधून निवडून आलेले रवींद्र चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. शुभ मुहूर्त पाहून प्रियंका गांधी शपथ घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता या दोन्ही नेत्यांचा शपथविधी बुधवारीच होणार आहे. शपथविधीअभावी दोन्ही नेत्यांना संविधान दिनानिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.