परभणी/गंगाखेड (Minor miss Abduction) : मामाच्या गावी राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना दि. १९ नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरात घडली. याप्रकरणी रविवार २४ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा (Minor miss Abduction) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की दोन महिन्यापूर्वी गंगाखेड शहरात मामाकडे राहण्यासाठी आलेली जना हेंडगे वय १७ वर्ष चार महिने नावाची मुलगी मंगळवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर गेली बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही. यामुळे जना हेंडगे हिच्या मामाने तिचा आई, वडील व नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला मात्र ती काही मिळून आली नाही. यामुळे मामा सुदाम निरस यांनी रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून कोणी तरी अज्ञात इसमाने माझी भाच्ची जना हेंडगे हिला पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरून (Minor miss Abduction) अज्ञात इसमाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनेराव बोडखे हे करीत आहेत.