Published on
:
22 Nov 2024, 4:48 am
Updated on
:
22 Nov 2024, 4:48 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटणाऱ्या सात माजी नगरसेवकांसह १६ पदाधिकाऱ्यांची मतदानाच्या एक दिवस अगोदर हकालपट्टी केल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणखी काही माजी नगरसेवक व पदाधिकारी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत करत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजपला धक्का बसला आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संबंधितांविरोधात कारवाई कधी होणार, असा सवाल पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांनी उपस्थित केला असून, आता पक्षाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक भाजपला आरसा दाखविणारी ठरली. महापालिकेची लांबलेली निवडणूक, पदाधिकाऱ्यांच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा विधानसभा निवडणुकीत भाजपला बंडखोरीची लागण करणारी ठरली. भाजपने अन्य पक्षांतून आलेल्यांना रेड कार्पेट अंथरत पदांची खिरापत वाटली. त्यातीलच काहींनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली, तर काहींनी पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रचारात उघडपणे सहभाग घेतला. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार व आमदार ॲड. राहुल ढिकलेंविरोधात माजी स्थायी समिती सभापती गणेश गितेंनी बंडखोरी करत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी केली. तर माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनीही पक्षविरोधी भूमिका घेत गिते यांना निवडणुकीत मदत केली. नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरेंविरोधात माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी बंडखोरी करत मनसेकडून निवडणूक लढविली. इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मुधकर हिंगमिरे, रवींद्र धिवरे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना उशिरा का होईना पक्षाने सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतरही प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पक्षातील इतर अनेकांनी पक्षविरोधात काम केल्याचे समोर आले आहे. अशा घटकांना पक्षात थारा देऊ नये, असे भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मत आहे. यासंदर्भात समाजमाध्यमांवर भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे भाजप अॅक्शन मोडवर आला असून, लवकरच संबंधितांवर दुसरी कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे.
सोयीच्या राजकारणाला विरोध
प्रदेश नेत्यांबरोबर संबंध प्रस्थापित केले म्हणजे पाहिजे ती पदे मिळतात व पाहिजे तसे सोयीचे राजकारण करता येते, अशा स्वरूपाचा भ्रम इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांचा झाला आहे. त्यामुळे पक्षाचे नाव खराब होत असून, यापुढे अशा चुकीच्या प्रथांना प्रखर विरोध केला जाईल, असा थेट इशारा एकनिष्ठ व निष्ठावानांनी दिला आहे.
हकालपट्टी करणाऱ्यांकडूनच आव्हान
भाजपतून हकालपट्टी करण्यात आलेल्यांपैकी काही माजी नगरसेवक व पदाधिकारी मात्र तुम्ही आम्हाला पक्षातून काढणारे कोण, आम्ही ज्या भाजपच्या एकमेव नेत्याला मानतो, त्या नेत्याचे आम्ही ऐकणार, अशा स्वरूपाची भाषा करीत असल्याने पक्ष मोठा की व्यक्ती मोठी, असा प्रश्न निष्ठावानांनी उपस्थित केला आहे.