उद्योगनगरीत दहशत पसरविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून उद्योग वर्तुुळात समाधान व्यक्त केले जात आहेPudhari News Network
Published on
:
08 Feb 2025, 4:01 am
Updated on
:
08 Feb 2025, 4:01 am
नाशिक : 'उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट मोका लावा' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला दिलेल्या निर्देशाने स्थानिक उद्योजकांना मोठे बळ मिळाले आहे. आता त्रास देणाऱ्यांची नावांची यादीच पोलिस आयुक्तांना सुपूर्द करणार असल्याचा मानस काही उद्योजकांनी बोलून दाखविल्याने, उद्योगनगरीत दहशत पसरविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
'आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातोय, खंडणी वसूल केली जात आहे' अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अशा गुंडांवर मोका लावण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. हा गुंड कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर मोकाचीच कारवाई करावी, खालची कारवाई करू नये, असे आदेशित केल्याने उद्योग वर्तुुळात मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. मागील काही काळापासून नाशिकच्या उद्योग क्षेत्रात गुंडगिरी माजविणाऱ्यांचे कारनामे सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही काळापासून स्क्रॅप माफियांनी पुन्हा एकदा डोकेवर काढल्याने, त्यांचा बंदोबस्त करण्याबाबतची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. हे गुंड विविध राजकीय पक्षातील असून, त्यांना बड्या राजकारण्यांचे पाठबळ मिळत असल्याचे आतापर्यंत बऱ्याचदा समोर आले आहे. त्यामुळे उद्योजक देखील या गुंडांविरोधात तक्रार करण्यास धजावत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मात्र, आता मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनीच, राजकीय पक्षाचा विचार न करता संबंधितावर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिल्याने, स्थानिक उद्योजकांकडून पोलिस यंत्रणेला उद्योगांना वेठीस धरणाऱ्यांची यादी सादर केली जाणार आहे. तसेच संबंधितांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जाणार आहे. दरम्यान, सध्या गाजत असलेल्या स्क्रॅप प्रकरणात दोन माजी नगरसेवकांसह अन्य पक्षाच्या दोघा राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने, पोलिसांकडून या स्क्रॅप माफियांवर कठोर कारवाईची अपेक्षा उद्योग वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा पोलिस प्रशासन गांभीर्याने घेणार हे नक्की. तथाकथित समाजसेवक, होर्डिंगछाप, खंडणीजीवी, पावतीजीवी जमात वेगवेगळ्या तक्रारी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करीत आहेत. पर्यावरण नियम, अतिक्रमण, कामगारांचे हित या अस्त्रांचा त्यांच्याकडून वापर होत आहे. अशा प्रवृत्तींवर आता पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचे आभार.
प्रदीप पेशकार, प्रदेश प्रभारी, भाजपा उद्योग आघाडी
मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा केवळ लोकप्रियतेपुरती नसावी, ही किमान अपेक्षा. त्यामुळे पोलिसांनी उद्योगांना त्रास देणाऱ्या गुंड टोळ्यांचा बंदोबस्त करावाच, शिवाय एमआयडीसी, एमपीसीबी, कामगार उपायुक्त कार्यालय, कारखाना निरीक्षक, जीएसटी या कार्यालयातील दलाल मंडळींची दहशत थांबवायला हवी.
जयप्रकाश जोशी, ज्येष्ठ उद्योजक