नागपूर (Nagpur):- विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या असलेल्या बहिणी आता नाआवडत्या होत आहे. कोणतीही पडताळणी न करता लाडक्या बहिणींना लाभ दिला. आता निवडणूक आटोपल्यानंतर पडताळणीची कुन्हाड उगारली जात असल्याची भावना महिलांमध्ये आहे. विभागाने केलेल्या पडताळणीत केवळ काटोलमध्ये १२२१ लाइक्या बहिणींकडे चारचाकी आढल्याने त्या नाआवडत्या होणार आहे. परंतु, केवळ काटोलमधील लाभार्थी महिलाच अधिक असल्याने राजकीय सुडातून कारवाई तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली आहे.
१२२१ लाडक्या बहिणींकडे चारचाकी आढल्याने त्या नाआवडत्या होणार..!
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी जुलै २० २४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतील महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections)महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता निकष बदलले जात आहे. २८ जून २०२४त ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला व कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या महिलांचा समावेश आहे.
परंतु, विभागाने केलेल्या पडताळणीत जिल्ह्यामध्ये केवळ काटोल तालुक्यातील लाभार्थी महिलासर्वाधिक आढळल्या. त्यानंतर नरखेड तालुक्याचा समावेश आहे. तर तीन तालुक्यात केवळ १-१ लाभार्थी महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकट्या काटोलमध्ये १२२१, महिलेकडे चारचाकी वाहन
राजकीयदृष्ट्या विचार केल्यास काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. जरी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सुपुत्राला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी माजी गृहमंत्र्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या राजकीय सुडभावनेतून तर कारवाई होत नसेल ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मिळालेल्या माहितीनूसार एकट्या काटोलमध्ये १२२१, नरखेडमध्ये ५, नागपूर (ग्रा.) सावनेर तालुक्यात एका महिलेकडे चारचाकी वाहन आढळून आले.