ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरी. (Image source- X)
Published on
:
08 Feb 2025, 10:24 am
Updated on
:
08 Feb 2025, 10:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ॲलेक्स कॅरीने शनिवारी दिग्गज गिलख्रिस्टचा विक्रम मोडला. आशियातील खेळपट्टीवर १५० धावांचा टप्पा गाठणारा तो ऑस्ट्रेलियातील पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. गॅले येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅरीने ही कामगिरी केली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या ८७ व्या षटकात, कॅरीने १५० धावा पूर्ण केल्या. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच हा टप्पा ओलांडला आहे. ९३ व्या षटकात तो तंबूत माघारी फिरला. कॅरीने १८८ चेंडूत १५ चौकार आणि दोन षटकारांसह १५६ धावा काढल्या. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या यष्टिरक्षक फलंदाजाकडून आशियामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता, त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेत प्रत्येकी १४४ धावा केल्या. या दोन्ही देशांमध्ये त्याचे एकमेव शतक, तसेच भारतात दोन शतके झळकावली आहेत. कॅरी आता गिलख्रिस्टशिवाय आशियामध्ये शतक करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा यष्टिरक्षक फलंदाजही ठरला आहे.