नाशिक : पेप्सिकोचे स्टिफन केहो व युजीन विलेमसेन यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत.Pudhari
Published on
:
22 Jan 2025, 3:41 am
Updated on
:
22 Jan 2025, 3:41 am
नाशिक : द्राक्ष, कांदा, डाळिंब यासह विविध पिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी 'पेप्सिको'कडून नाशिकमध्ये मूल्य साखळी निर्माण केली जाणार आहे. पुढे या साखळीचा विस्तार महाराष्ट्रभर करण्याचा विचार असून, कृषी क्षेत्राबरोबरच अन्न व तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव कार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार दावोसमध्ये करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टवरून दिली आहे.
दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कल्याणी समूहाकडून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर नाशिकमध्ये 'पेप्सिको' या आंतरराष्ट्रीय पेयजल कंपनीकडून कृषी, अन्न व तंत्रज्ञान या क्षेत्रात मूल्य साखळी निर्माण केली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्स पोस्ट करीत म्हटले की, 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी युजीन विलेमसेन आणि पेस्पिकोचे स्टिफन केहो यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली आहे. पेप्सिकोकडून नाशिकमध्ये मूल्य साखळी निर्माण केली जाणार असून, पुढे त्याचा महाराष्ट्रभर विस्तार केला जाणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
दरम्यान, पेप्सिको महाराष्ट्रातील कृषी, अन्न, तंत्रज्ञान आणि उत्पादन या क्षेत्रावर काम करीत आहे. 'कृषी' महाराष्ट्राची ताकद असल्याने, या क्षेत्रातच मोठी गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अन्न, ड्रोन तंत्रज्ञान आणि पीक चक्र व्यवस्थापनासाठी 'एआय'ची देखील मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, पेप्सिकोकडून आपल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात नाशिकपासून केली जाणार असल्याने, नाशिकच्या कृषी क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी किती कोटींची गुंतवणूक केली जाणार याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकली नसली तरी, दावोसमधून दीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकच्या वाट्याला गुंतवणूक आल्याचे समाधान उद्योग वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
मूल्य साखळी निर्माण करताना पेप्सिकोकडून कृषी, अन्न व विज्ञान विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यातदेखील रस दर्शविला आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कृषी व अन्य क्षेत्रात गुंतवणूक वाढवून अर्थकारणाला बूस्ट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नाशिककरांसाठी ही आनंदाची बाब असून, जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी अशा प्रकारची कृषी मालासाठी मूल्यसंवर्धन साखळी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीचा विकास करणे शक्य होणार आहे.
- प्रदीप पेशकार, प्रदेश प्रभारी, भाजप उद्योग आघाडी