जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गPudhari
Published on
:
22 Jan 2025, 7:01 am
Updated on
:
22 Jan 2025, 7:01 am
दोन वर्ष पूर्ण होऊनही जामखेड-सौताडा महामार्गाचे काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून, धुळीचा सर्वाधिक त्रास जामखेडकरांना सहन करावा लागत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले जामखेड-सौताडा रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा असतानाही तो रस्ता पूर्ण होताना दिसत नाही. हा महामार्ग मराठवाड्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मानला जातो. असे असतानाही ठेकेदार कंपनी या रस्ताकामाकडे दुर्लक्ष करत असून, दोन वर्ष झाले तरी रस्ताकाम अपूर्णावस्थेत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पालकमंत्री, खासदार, दोन आमदार असतानाही रस्ता पूर्ण होत नसल्याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे जामखेड-सौताडा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी आशा नागरिकांची होती. मात्र, ती फोल ठरली. आता निवडणुका झाल्यामुळे रस्ताकामाला गती मिळत नसल्याची खंत नागरिकांतून बोलून दाखविण्यात येत आहे. आ. रोहित पवार व सभापती प्रा. आ. राम शिंदे यांनी रस्ताकामाबाबत टाळाटाळ केल्याचीही नागरिकांत चर्चा आहे.
जामखेड-सौताडा महामार्गाची अवस्था खराब झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीडशे कोटी रुपये या रस्त्यासाठी देऊन गेल्या दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पंचदेवालय मंदिर कर्जत फाटा ते खर्डा चौक व समर्थ हॉस्पिटलपासून पुढे बीड रोडपर्यंत दोन्ही बाजूने, तर काही ठिकाणी एका बाजूने सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील काम बंद आहे. शहरातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असताना खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. यातील खर्डा चौक ते बीड कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या रस्त्याचे काम बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकारी व पदाधिकार्यांनी चुप्पी साधली आहे.
तालुक्याला गेल्या अडीच वर्षापासून एक नव्हे तर दोन-दोन आमदार लाभलेले असतानाही एकाही आमदाराने स्वतःहून पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविला नाही. आमदार लक्ष देत नसल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रोहित पवार हे विधानसभेवर आमदार असून, प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेवर आमदार व आत्ता सभापती आहेत. दोन्ही आमदारांचे राजकीय ‘वजन’ असतानाही या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात का आले हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
विधानसभा निवडणुकीआधी रस्त्याच्या कामाने जोर धरला असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामे बंद तर केली नाही ना अशाही चर्चांना तोंड फुटले आहे. सध्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत. याकडे दोन्ही आमदारांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याची अपूर्ण कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
रस्ता किती जणांचे बळी घेणार ः टापरे
शहरात गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस जामखेड-सौताडा रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे पूर्वीचा रस्ता खोदण्यात आला असून, काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे रस्त्याने वाहतूक करताना अनेकदा अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हा रस्ता अजून किती जणांचा जीव घेणार, असा सवाल मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे यांनी उपस्थित केला आहे.