नऱ्हेत सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; नागरिकांमध्ये संतापfile photo
Published on
:
22 Jan 2025, 9:57 am
Updated on
:
22 Jan 2025, 9:57 am
धायरी: नर्हे येथे गेल्या सहा दिवसांपासून पाणी आले नसल्यामुळे महिला आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिसरातील पाण्याच्या एटीएम केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
नर्हे परिसरात शैक्षणिक संस्था, मोठे गृहप्रकल्प, औद्योगिक वसाहती आणि हॉस्पिटल असल्यामुळे नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, परिसरात गेल्या सहा दिवसांपासून पाणी आले नसल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. मुलांना शाळेत सोडवायचे, कामाला जायचे, घरचे काम करायचे की पाण्यासाठी वणवण फिरायचे, अशी अवस्था येथील महिला व नागरिकांची झाली आहे.
रहिवासी लता राजगुरू म्हणाल्या की, पाणी नसल्यामुळे आमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन पाण्यासाठी जीव मेटाकुटीला आला आहे. रोज उठून भांडी घेऊन नळ कोंडाळ्यावर पाण्याची वाट पाहत बसावे लागते आहे. पाणी सोडणार्या कर्मचार्याने फोन बंद ठेवला आहे. प्रशासनाने तातडीने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.
नर्हे परिसरात पाणीपुरवठा न केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा करावा; अन्यथा नागरिकांच्या वतीने हंडा मोर्चा काढला जाईल.
- भुपेंद्र मोरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघ (अजित पवार गट)
विद्युत पंप बंद पडल्यामुळे, तसेच जनित्र नादुरुस्त झाल्यामुळे नर्हे गावाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. आता ही तांत्रिक अडचण दूर झाली असून, परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल.
- दीपक रोमन, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग