कोंबड्यांचा मृत्यू Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 9:59 am
Updated on
:
22 Jan 2025, 9:59 am
चितळी (ता. राहाता) येथे बिबट्याची दहशत संपत नसून चितळी-दिघी रोडलगत दीपक वाघ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसून मंगळवारी (दि. 22) पहाटेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. त्यात तब्बल 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कोपरगाव वनक्षेत्रपाल युवराज पचाराने, वनरक्षक पी. डी. गजेवार, संजय साखरे, अक्षय बडे इत्यादी वनाधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये कोंबड्या बसत नसल्याने नुकसानभरपाई मिळणार नसल्याचे वन अधिकार्यांनी सांगितले आहे. ते आम्हाला पेलवणारे नसून शासनाने आम्हाला नुकसानभरपाईच्या निकषात समाविष्ट करून भरपाई द्यावी, अशी मागणी दीपक वाघ यांनी केली आहे.
महिनाभरापूर्वीच चितळी परिसरातील बी. जे. साळुंखे पेट्रोल पंपानजीक बिबट्याने मोठी भीती पसरवली होती. याच दरम्यान रस्त्याने ये-जा करणार्या अनेकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या. अनेकदा चितळी परिसरात बिबट्या शेतकर्यांना दर्शन देत आहेे. वन विभागाने अनेक उपाययोजना करूनही हा बिबट्या जेरबंद होत नाही. वन विभागाने परिसरात ड्रोनचा वापर केला तरी बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश येत आहे. अनेक ठिकाणी पिंजरे लावूनही काहीच फायदा होत नाही. त्याबाबत रहिवासी व शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या बिबट्याला ठार करण्याची मागणी त्यातून पुढे आली; मात्र ती वन विभागाने नामंजूर केल्याचे समजते. वन विभागाने आता ठोस पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.