Published on
:
22 Jan 2025, 9:57 am
Updated on
:
22 Jan 2025, 9:57 am
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
पालिकेच्या मालकीचे डम्पिंग ग्राउंड एवढ्या वर्षात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात अक्षरशः अपयशी ठरलेल्या ठाणे महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल २३०० कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. अत्याधुनिक वाहनांच्या सहाय्याने कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक यामध्ये करण्यात येणार असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
मात्र पूर्वीच्या प्रस्तावात या कामांसाठी पुढच्या १० वर्षांसाठी १००० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असताना आता काढण्यात आलेल्या निविदेमध्ये मात्र हाच खर्च २३०० कोटींवर गेला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हक्काचे डम्पिंग ग्राउंड नसताना हा प्रस्ताव म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थापनेपासून पालिका प्रशासनाला कचऱ्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यामुळे कचऱ्याच्या मुद्यावरून अनेकवेळा आंदोलनेही केली आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक प्रयोग केले आहेत. मात्र हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्याने ठाणे शहरात अजूनही कचऱ्याच्या प्रश्न अनुत्तरितच आहे.
ठाणे शहरात १००० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. यापैकी २०० मॅट्रिक टन कचरा हा बांधकामाचा आहे. ८०० मेट्रिक टन कचऱ्यापैकी ४२५ मेट्रिक टन कचरा हा ओला असून ३७५ मेट्रिक टन कचरा हा सुखा कचरा आहे. ४२५ मेट्रिक टन कचऱ्यापैकी मोठ्या गृहसंकुलांमध्ये ८० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र सर्वात महत्वाची समस्या आहेत ती कचरा संकलन, वाहतूक आणि कचरा वर्गीकरणाची.
सध्या घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाते. एकीकडे डंपिंग ग्राउंड देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेले नाही. तर कचरा संकलन आणि वाहतूक देखील योग्य पद्धतीने होत नसल्याचे समोर आले आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी पुढील १० वर्षांसाठी ठाणे महापालिकेने शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी कंपनीची निवड केली जाणार आहे. शहरातील झोपडपट्टीचा परिसर तसेच इमारतींमध्ये निर्माण होणार ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित करण्यात येणार आहे. त्याचसोबत ग्रीन वेस्ट, चिकन मटण, रस्त्यावर झाडू मारल्यानंतर राहणाऱ्या कचऱ्याचेही व्यवस्थापन केले जाणार आहे. यासाठी बॅटरी ऑपरेटेड वाहनांच्या माध्यमातून हे व्यवस्थापन केले जाणार आहे.
जुन्या घंटा गाड्या स्क्रॅपमध्ये काढणार...
ठाणे महापालिका क्षेत्रात २०१४ पासून कार्यरत असलेल्या जुन्या घंटा गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. त्यांच्या जागी नवीन अत्याधुनिक गाड्यांची कचऱ्याची वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापन संपूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
५० टक्के वेतन काम बघून होणार...
या सर्व कामांसाठी ज्या कंपनीची निवड करण्यात येईल, त्या संबंधित कंपनीला ५० टक्के वेतन हे कंपनीचे काम बघून देण्यात येणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे. गाड्या कचरा संकलना- साठी बाहेर पडल्या नाहीत, तर हे वेतन कापण्याची अट ठेवण्यात आली आहे. याशिवाय या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील संबंधित कंपनीलाच करावा लागणार आहे.
१० वर्षांनी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर ठाणे महापालिकेला सोपवणार
ज्या कंपनीची या कामासाठी निवड होईल त्या कंपनीस पुढील १० वर्ष कचऱ्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. यासाठी १० वर्ष महापालिका २३०० कोटी रुपये मोजणार आहे. १० वर्षांनी मात्र या कंपनीने उभारलेली सर्व यंत्रणा पालिकेला सोपवावी लागणार असल्याची अट टाकण्यात आली.
हा तर मोठा घोटाळा - आव्हाड
कचरा संकलन व वाहतुकीस २३०० कोटींची निविदा काढणार असल्याची पालिका वर्तुळात चर्चा असून कचरा टाकणार कुठे? हा महत्वाचा प्रश्न आहे. ठाणे महापालिकेला एवढ्या वर्षात हक्काचे डम्पिंग ग्राउंड तयार करता आले नाही आणि केवळ कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी २३०० कोटींची निविदा काढणे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शहराला मुबलक पाणी नाही, धरण नाही, विधानसभेत यावर प्रश्न मांडल्यावर गांभीर्य नसलेले मंत्री टिंगल करतात. ही निविदा म्हणजे पैसे जमा करण्याचे टेंडर असून हे पालिका आयुक्तांनी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
आ. जितेंद्र आव्हाड