बिहारमधील एका प्रकरणाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. राहुल गांधी यांच्या भाषणामुळे आपले 250 रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्याने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भडकाऊ भाषणामुळे आपल्या हातात असलेली दुधाची बाटली भीतीने जमिनीवर पडली आणि नुकसान झाले असा अजब दावा या व्यक्तीने केला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
सोनपूर येथील मुकेश चौधरीचा दावा काय?
समस्तीपूर येथील सोनपूर गावातील मुकेश कुमार चौधरी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतीय राज्य व्यवस्थेविरोधात भडकाऊ भाषण दिले. 15 जानेवारी 2025 रोजी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्धघाटनावेळी त्यांनी भाषण केले. आपली लढाई ही केवळ भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातच नाही तर भारतीय राज्याविरोधात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे आपण घाबरल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.
हे सुद्धा वाचा
त्यांचा भारत राज्य व्यवस्थेला विरोध
कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय राज्य व्यवस्थेविरोधात लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी भारतीय राज्य व्यवस्थेला विरोध केला. त्यांनी त्यासाठी काहीही करण्याचा निर्धार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
चौधरी म्हणाले की, राहुल गांधी यांचे हे भाषण त्यांनी टीव्ही आणि मोबाईलवर पाहिले. ज्यावेळी त्यांनी हे वक्तव्य पाहिले त्यावेळी ते घरातून दुधाची बादली घेऊन जात होते. पण या वक्तव्यामुळे ते इतके घाबरले की, त्यांच्या हातून बादली खाली पडली. त्यामुळे या बादलीतील 5 लिटर दूध जमीनवर सांडले, मोठे नुकसान झाले.
या घटनेमुळे आपले 250 रुपयांचे नुकसान झाले. तर त्यांच्या या वक्तव्याने मानसिक धक्का बसला तो वेगळाच. आपल्याला असुरक्षित वाटू लागले, असा दावा करत रोसरा येथील प्राथमिक न्यायदंडाधिकाऱ्यांकडे त्यांनी नुकसान भरपाईसाठी दाद मागितली आहे.
(इनपुट- ज्योति कुमार सिंह)