ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने गेल्या वर्षी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. ही योजना अल्पवधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, त्यामध्ये देखील लाडक्या बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून देण्यात आलं होतं.
आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल्यानं 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र सध्या तरी महिलांच्या खात्यात 1500 रुपयेच जमा होणार आहेत, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात एकूण सहा हाफ्ते जमा करण्यात आले आहेत. जानेवारीचा हाफ्ता देखील येत्या 26 जानेवारीच्या आधी जमा होऊ शकतो.
दरम्यान या योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ज्या महिला या योजनेत बसत नाहीत, मात्र तरी देखील लाभ घेत आहेत त्यांच्या आर्जाची पुन्हा एकदा पडताळणी होऊ शकते. अर्जाची पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार का असा अनेकांना प्रश्न पडला होता. त्यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?
आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे, अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, मात्र शासनाने कुठलाही लाभ परत घेतलेला नाहीये. योजनेचं मुल्यमापन करणं यात नवीन काही नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आदिती तटकरे यांच्या या घोषणेमुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.