कुत्रा आरोपीच्या पिंजर्यातpudhari
Published on
:
22 Jan 2025, 9:53 am
Updated on
:
22 Jan 2025, 9:53 am
पोलिस ठाण्यात दररोज हाणामारी, खून, चोरी, दरोडा अशा विविध स्वरूपाचे गुन्हे रोज दाखल होत असतात. आणि पोलिसही याचा तपास करत गुन्हेगारावर कारवाई करतात. मात्र संगमनेर शहर पोलिस ठाण्यात एका डॉक्टरच्या कुत्र्या विरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
रस्त्याने दुचाकीवरून जाणार्या महिलेच्या पाठिमागे कुत्रा लागला. पाठलाग करत असताना महिला दुचाकीवरून खाली पडुन जखमी झाली. संगमनेर शहरालगत घुलेवाडी शिवारात असलेल्या नवशीचा मळा येथे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात रविवारी पोलिसांनी नवशीचा मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर येथील महिलेने रुग्णालयात उपचार घेताना दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी महिला शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारातील नवशीचा मळा येथे कुटुंबासह राहते. तिथेच एक डॉक्टर राहत आहेत. त्यांच्याकडे रॉट व्हीलर जातीचा पाळीव कुत्रा आहे. यापुर्वीही हा कुत्रा फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरातील नागरिकांच्या अंगावर गेला असून त्यात ते जखमी झाले आहे. बुधवारी देखील (दि.15 जानेवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्याकडील दुचाकीवरून मुलीला शाळेतून घेऊन घरी येत असताना घराजवळ असलेल्या डॉक्टरकडील पाळीव कुत्रा गेटमधून दुचाकी चालवत असलेल्या फिर्यादी महिलेच्या अंगावर आला.त्यामुळे फिर्यादी महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात फिर्यादी महिलेला मार लागून ती जखमी झाली. हा अपघात डॉक्टरांचा कुत्रा अंगावर आल्याने झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात डॉक्टर पानसरे यांच्या पाळीव कुत्र्या विरोधात भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गजानन वाळके करत आहे. या घटनेची शहर व तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे.
या गुन्ह्यात आरोपीमध्ये प्रथमत:च एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलिस या प्रकरणी नेमका काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे.