बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे हे तब्बल एक लाख 29 हजार 297 एवढे विक्रमी मताधिक्य घेत विजयी झाले.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 10:13 am
बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे हे तब्बल एक लाख 29 हजार 297 एवढे विक्रमी मताधिक्य घेत विजयी झाले. त्यांना एक लाख 59 हजार 681 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांना 30 हजार 384 मतांवर समाधान मानावे लागले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या जयश्री गरुड या चार हजार 413 मते मिळवून तिसर्या स्थानावर राहिल्या. बोरसे यांनी दणदणीत विजय मिळवताना उर्वरित सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे. सर्वाधिक मताधिक्य मिळवत त्यांनी तीन वेळा आमदार होण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. मतमोजणीस मराठा हायस्कूलच्या देव मामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात शनिवार (दि.23) सकाळी सुरुवात झाली.
बोरसेंनी केले प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
एक लाख 29 हजार 297 इतके विक्रमी मताधिक्य
तीन वेळा आमदार होण्याचा दिलीप बोरसेंचा विक्रम
मिळालेली मते
दिलीप बोरसे - 1,59,681
दीपिका चव्हाण - 30,384
जयश्री गरुड - 4,413
पहिल्या फेरीपासूनच बोरसे यांनी मोठी आघाडी घेतली होती, ती एकविसाव्या फेरीपर्यंत कायम राहिली. टपाली मतदानातही बोरसे यांची आघाडी कायम राहिली. अखेर ते विक्रमी एक लाख 29 हजार 297 मतांची आघाडी घेत विजयी ठरले. दीपिका चव्हाण यांना केवळ 30 हजार 384 मतांवर समाधान मानावे लागले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या जयश्री गरुड ह्या चार हजार 413 मते मिळवून तिसर्या क्रमांकावर राहिल्या. मतमोजणीसाठी एकूण 20 टेबल ठेवण्यात आले होते. 16 टेबलांवर मतदान यंत्रातील, तर उर्वरित 4 टेबलांवर टपाली मतदानाची मोजणी झाली. एकूण 21 फेर्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. मतमोजणीसाठी जवळपास पाच तासांचा अवधी लागला. अंतिम फेरीचा निकाल 2.30 वाजता समजला. अर्थात अधिकृत घोषणा होण्यासाठी यापेक्षा अधिक कालावधी लागल्याचे दिसून आले.
आमदार दिलीप बोरसे यांचा विजय होताच महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अक्षरशः गुलालाचा संपूर्ण डम्परच भरून आणला होता. विजयी मिरवणुकीत या डम्परवरून गुलालाची उधळण करण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
ज्या पद्धतीने मतदानात महिलांचा टक्का वाढला त्याच पद्धतीने विजयी मिरवणुकीतही महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली. महिलांसह पुरुषांनीही ठेका धरला होता.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी आमदार बोरसे यांचे औक्षण केले. मतमोजणी केंद्राजवळ क्रेनच्या साहाय्याने त्यांना भला मोठा हार घालून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.
हा विजय माझा एकट्याचा नसून, माझ्यावर प्रेम करणार्या तालुकावासीयांचा आहे. त्यांनी जो विेशास दाखवला तो सार्थकी ठरवून आगामी पाच वर्षांत राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढेन. मते मागायला गावोगावी आलो त्याच पद्धतीने सगळ्या मतदारांची भेट घेण्यासाठी लवकरच येत आहे.
दिलीप बोरसे, आमदार
बागलाण तालुक्यातील निकाल हा धनशक्तीचा विजय आहे.जनतेने दिलेला कौल मान्य असला, तरी या व्यतिरिक्त अधिक काही प्रतिक्रिया देता येणार नाही.
दीपिका चव्हाण