परभणीत मतदान करताना बॅलेट युनिटचा फोटो मोबाईलवर काढला
परभणी (Parbhan Election Voting) : बॅलेट युनिटवरील एका चिन्हासमोरील बटन दाबत मतदान करतानाचा फोटो मोबाईलमध्ये घेऊन फेसबुक अकाऊंटवर व्हायरल करत मतदान प्रक्रियेच्या गोपणीयतेचा भंग करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शाखा अभियंता प्रविण दामोदर देवसेटवार यांनी नानलपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी शारदा महाविद्यालय येथील (Parbhan Election Voting) मतदान केंद्रावर शेख सुलेमान या मतदाराने स्वत:चे मतदान करताना बॅलेट युनिटवरील एका उमेदवाराच्या नावासमोरील निशानीवर बटन दाबुन मत टाकल्याचा फोटो मोबाईल मध्ये घेतला. सदर फोटो फेसबुक अकाऊंटवर व्हायरल करत मतदान प्रक्रियेच्या गोपणीयतेचा भंग केला.
सदर प्रकार पुढे आल्यानंतर शेख सुलेमान याच्यावर नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि. चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि. देवकर करत आहेत. दरम्यान, मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास प्रतिबंध आहे. तरी देखील काही उत्साही मतदार मोबाईल घेऊन जात असल्याचे दिसत आहे.