अडचणीत असलेल्या हिंदुस्थानी संघाला पर्थ कसोटीत कर्णधार रोहित शर्माची खरी गरज होती. त्याने पर्थ कसोटीत खेळावे, असे क्रिकेटप्रेमींनीच नव्हे अनेक दिग्गजांनी आवाहन केले होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन रोहित पर्थला पोहोचतोय, पण तो कसोटीत खेळणार नाहीय. केवळ संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी तो कसोटीच्या तिसऱया दिवसापासून संघासोबत असेल आणि ऍडलेड कसोटीत हिंदुस्थानचे पुन्हा एकदा नेतृत्व करील. ही आनंदाची बातमी बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवापूर्वीच रोहित शर्माने आपण बाबा होणार असल्यामुळे कळवले होते. तेव्हापासून त्याच्या ऑस्ट्रेलियातील पर्थ कसोटीत खेळण्याबाबत अनिश्चितता कायम होती. मात्र 15 नोव्हेंबरला तो दुसऱयांदा बाबा झाला. त्यामुळे तो 20 तारखेपर्यंत पर्थ गाठेल, अशी अपेक्षा होती, पण त्याने दोन दिवसांपूर्वीच आपण पर्थमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आणि जसप्रीत बुमरा संघाचा हंगामी कर्णधार झाला. आता तो उद्या शनिवारीच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे.
फक्त कसोटी पाचव्या दिवसापर्यंत चालू दे
हल्ली कसोटी क्रिकेटचा खेळ अडीच-तीन दिवसांतच खल्लास होतोय. हिंदुस्थान मुंबईच्या वानखेडेवर आणि पुण्यात अडीच दिवसांतच हरले होते. त्यामुळे हिंदुस्थानी संघाने पर्थवर आपला संघर्षपूर्ण खेळ दाखवत ही कसोटी पाचव्या दिवसापर्यंत न्यावी, अशी माफक अपेक्षा हिंदुस्थानी चाहत्यांनी केली आहे.