एकतर्फी प्रेमातून शिक्षकाकडून विद्यार्थिनीची छेड File Photo
Published on
:
22 Nov 2024, 3:52 am
Updated on
:
22 Nov 2024, 3:52 am
नाशिक : गोवर्धन शिवारात एका महाविद्यालयीन शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची छेड काढली. तसेच विवाह करण्यासाठी जबरदस्ती करीत तिच्या भावास मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. २१) घडली. त्यानंतर विद्यार्थिनीच्या नातलगांनी शिक्षकाच्या वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात शिक्षकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धन शिवार येथे असलेल्या एका महाविद्यालयातील शिक्षकाने विद्यार्थिनीस त्रास दिल्याची तक्रार तिच्या नातलगांनी केली. विद्यार्थिनीचे नातलग शिक्षकाची समजूत काढण्यासाठी गुरुवारी (दि. २१) महाविद्यालयात गेले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. शिक्षकाने विद्यार्थिनीच्या भावास शिविगाळ व धक्काबुक्की केली. तसेच शिक्षकाचे वडिल कोयता घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी विद्यार्थिनीच्या भावावर हल्ला करीत दुखापत केली. तर विद्यार्थिनीच्या नातलगांनीही शिक्षकाच्या वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. शिक्षकासह त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.