सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि लाईक्स मिळवण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. दिल्लीतील एका यूट्यूबरने रील्ससाठी चक्क म्हशीवर बसून रुग्णालय गाठले. यूट्यूबरचे हे कृत्य परिसरात चर्चेचा विषय बनला. रुग्णालयात नागरिकांनी यूट्यूबरला पाहण्यासाठी गर्दी केली होती. लोकं त्याचे व्हिडिओ बनवू लागले. याप्रकरणी पोलिसांनी सदर यूट्यूबरवर कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशातील अमरोहा शहरातील मोहल्ला कोट येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीस्थित यूट्यूबर रिहान आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अमरोहा येथे आला होता. येथे आल्यानंतर त्याने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं.
आपले फॉलोवर्स आणि प्रेक्षकांसाठी खास व्हिडिओ बनवण्यासाठी तो थेट म्हशीवर स्वार होऊन सार्वजनिक आरोग्य केंद्रात पोहोचला. म्हशीवर बसून आरोग्य केंद्रात पोहोचताच तेथे लोक जमा झाले आणि त्यांनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. काही वेळातच आरोग्य केंद्राबाहेर मोठा जमाव जमला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ आरोग्य केंद्रात दाखल झाले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी युट्यूबरवर कारवाई करण्यात आली. शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी यूट्यूबरला चलान जारी केले. मात्र, काही तासांच्या चौकशीनंतर आणि औपचारिक कारवाईनंतर यूट्यूबरची जामिनावर सुटका करण्यात आली.