Published on
:
22 Nov 2024, 4:02 am
Updated on
:
22 Nov 2024, 4:02 am
मुंबई : राज्यातील मतदानाचा टक्का बुधवारी ६५.११ वर होता तो गुरूवारी रात्री हाती आलेल्या सुधारित माहितीनुसार ६६.०५ टक्क्यांवर पोहोचला असून काल रात्रीच्या आकडेवारीत जवळपास १ टक्का वाढ झाल्याचे दिसत आहे.
शनिवारी मतमोजणी होणार असून सकाळी ९.३० च्या दरम्यान पहिला कल प्राप्त होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुधारित आकडेवारीनुसार ७६.६३ टक्क्यांवर पोहोचले. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्री ७३.६८ टक्क्यांवर असलेले मतदान सुधारित आकडेव ारीनुसार ७५.२६ टक्क्यांवर पोहोचले. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. या प्रक्रियेदरम्यान, पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी ८.३० वाजता सुरू होईल आणि ९.३० पर्यंत मतमोजणीची पहिली फेरी पार पडून पहिला कल प्राप्त होईल, असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. सकाळी ८ वाजताच काही वृत्तवाहिन्या पहिला कल जाहीर करतात, जे चुकीचे असून सकाळी ९.३० च्या पूर्वी पहिला कल प्राप्त होत नाही, असेही आयोगातील उच्च्त्वपदस्थांनी सांगितले. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे.
२८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ मतमोजणी केंद्रे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १ मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ मतमोजणी निरीक्षक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २ मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत. त्यामुळे २८८ मतमोजणी केंद्रांवर १ हजार ७३२ टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि ५९२ टेबल्स इटीपीबीएमएस स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत. सर्वसाधारण मतमोजणीसाठी किमान १४ टेबल एका मतमोजणी केंद्रांवर असतील. सरासरी ३०० ते ४०० ईव्हीएम एका मतमोजणी केंद्रांवर असतील. सकाळी ८.३०नंतर सुरू झालेल्या फे-या सुरूवातीला ५० मिनिटे ते १ तास व नंतरच्या फे-यांचा वेळ कमी होत जाऊन २० ते २५ मिनिटात नंतरच्या फेऱ्या पार पडतील. एक फेरी पोस्टल मतांच्या मोजणीची असेल.
मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत व्यापक प्रसिद्धी दिली आहे. निवडणूक लढविणारा उमेदवार/राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्रॉग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल.
८५ हून अधिक वयाच्या ६८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि १२ हजाररांपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी गृह मतदानाचा लाभ घेतला. ३६ हजारांहून अधिक अत्यावश्यक सेवा मतदारांनी पोस्टल मतपत्रिकांद्वारे मतदान केले आणि ४ लाख ६६ हजार ८२३ पोस्टल मतपत्रिका निवडणूक कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या