अबब स्थानिक गुन्हे शाखेची गंगाखेड
येथे कारवाई
मात्र परभणी जिल्ह्यात पुरवठा करणारं मोहरक्या सापडेना
परभणी/गंगाखेड: परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार २५ नोव्हेंबर रोजीच्या पहाटे गंगाखेड शहरात टाकलेल्या धाडीत अंदाजे पाऊणे पाच लाख रुपये किंमतीचा गुटखा व एक कार असा एकुण ७,७२,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई प्रमाणेच शहरात ठोक तसेच फेरी करून गुटखा विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई करून व्यसनधीन तरुणाईला यातून मुक्त करावे अशी मागणी सुज्ञ शहर वासीयांतुन होत आहे.
गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्रीसाठी बंदी घातलेल्या गुटख्याची शहरातील काही व्यापारी परराज्यातून आयात करून दत्त मंदिर परिसर, नवा मोंढा परिसर व मोंढ्यातून बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, होळकर चौक परिसर, परळी नाका आदी भागात खुलेआमपणे ठोक आणि किरकोळ विक्री करीत आहेत तर दहा ते पंधरा जण स्कुटी व अन्य दुचाकीवरून शहरासह ग्रामीण भागात फेरी करून मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री करत असल्याची चर्चा शहरात होत आहे. अशातच गंगाखेड शहरात एका वाहनातून प्रतिबंधित गुटखा येणार असल्याची गोपनीय माहिती समजल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग भारती, जमादार लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, पो. शि. परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, चालक हनवते आदींच्या पथकाने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजीच्या पहाटे २:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील जगदंबा ट्रेडर्सच्या मागे असलेल्या पत्राचे गाळ्यात छापा मारून सुमारे ४,७२,५०० रुपये किंमतीच्या केसर युक्त गोवा १००० गुटख्याच्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या एकूण २७ पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये एकूण ७० पाऊच असे एकूण १८९० पाऊच व गुटखा वाहतूकीसाठी वापरल्या जाणारी अंदाजे तीन लाख रुपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कंपनीची कार क्रमांक एमएच ४८ एफ १८९० असा एकूण ७७२५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) भा.न्या.सं. सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेतले आहे. या कारवाईने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे तर याप्रमाणेच पोलीसांनी अन्य गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून व्यसनधीन होत असलेल्या तरुणांना यापासून वाचवावे अशी मागणी सुज्ञ शहर वासीयांतुन केली जात आहे.