Published on
:
25 Nov 2024, 1:23 pm
डोंबिवली : काटई-बदलापूर पाईपलाईनसह कल्याण-शिळ महामार्गावर ठिकठिकाणी बेकायदा थाटलेले चायनिज ढाबे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी असतानाही अशा चायनिजच्या ढाब्यांवर बिनबोभाट चालणाऱ्या दारूच्या अड्ड्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन पलाव्यातील कासारिओ भागात असलेल्या जय मल्हार चायनिज ढाब्यावर कारवाई केली. या कारवाईची खबर सर्वत्र पसरताच या भागातील बेकायदा ढाबेवाल्यांची घाबरगुंडी उडाली आहे.
या ढाब्यावर विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या चालकाच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनांनुसार कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा धंद्यांच्या विरोधात आठही पोलिस ठाण्यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. अजिनोमोटो नावाच्या घातक केमिकलचा चायनीजच्या कोणत्याही पदार्थांमध्ये सर्रास वापर केला जातो. या केमिकलच्या प्रादुर्भावामुळे हाडे ठिसूळ बनतात आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला निमंत्रण मिळते. अशा चायनीजवाल्यांच्या विरोधात पोलिसांनी आक्रमक कारवाया सुरू केल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, हवालदार विजय आव्हाड आणि गस्ती पथक रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पलावा कासा रिओ भागात गस्त घालत होते. जय मल्हार चायनिज ढाब्यावर ग्राहकांना दारू पिण्यास मुभा दिली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. तेथील ग्राहक खुर्चीवर बसून टेबलावर ठेवलेले दारूचे पेग घशाखाली रिचवत बसले होते. पोलिसांनी ढाब्यात घुसून तेथील वेटर आणि ढाब्याचे प्रमुख शशिकांत कुंभार यांच्याकडे चायनिज ढाब्यात मद्य विक्री करण्यासाठी लागणाऱ्या परवान्याची विचारणा केली. असा परवाना आमच्याकडे नसल्याची माहिती कुंभार यांनी पोलिसांना दिली.
परवाना नसताना ग्राहकांना बेकायदेशीरपणे मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करून, तसेच विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चायनिज ढाब्याचे चालक शशिकांत कुंभार यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रतिबंधित कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी कुंभार यांना ताब्यात घेतले आहे. कुंभार हे पडले गाव जवळील नौपाडा गावचे रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.