Pune News: विधानसभेला एकी, आता पालिकेला आमने-सामने येण्याची शक्यता pudhari
Published on
:
25 Nov 2024, 5:06 am
Updated on
:
25 Nov 2024, 5:06 am
Pune Political News: विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता आगामी काळात होणार्या महापालिका निवडणुकीत ही युती टिकणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर पडला आहे. एकत्र निवडणुका लढविल्यास जागावाटपाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे विधानसभेला एकत्र आलेल्या महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे आता महापालिका निवडणुकीतही लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात होईल. मात्र, विधानसभेत एकत्र आलेल्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही समोर आता मोठा गंभीर पेच उभा राहणार आहे. प्रामुख्याने महायुतीसाठी तर ही मोठी डोकेदुखी होणार आहे. महायुतीने पुणे शहरातील आठपैकी सात जागांवर विजय मिळविला. त्यामधील सहा जागांवर भाजपचे, तर एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचाच दावा अधिक असणार आहे.
विशेष म्हणजे 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने 98 जागा जिंकल्या होत्या. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या होत्या. आता हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यांच्या समवेत शिवसेना आहे, त्यामुळे महायुती म्हणून एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय झाल्यास जागावाटप हा मोठा पेच निर्माण होणार आहे.
त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुती टिकविणे अवघड असून तीनही पक्ष स्वतंत्रच निवडणुका लढवितील हे स्पष्ट आहे, त्याचा सर्वाधिक फायदा सद्य:स्थितीवरून पुन्हा सत्ताधारी भाजपलाच अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महाविकास आघाडीसमोरही आता महापालिकेला जाताना कडवे असणार आहे. विधानसभा निवडणुकीत मोठी वाताहत झाली.
प्रामुख्याने वडगाव शेरीचा अपवाद वगळता अन्य मतदारसंघांत मोठ्या फरकाने आघाडीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे महापालिकेत स्वतंत्र निवडणुका लढविल्यास सत्तेतील पक्षांसमोर कसा टिकाव लागणार, असा प्रश्न आहे. तर महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढल्या तरी पुन्हा जागावाटपाचा पेच असणार आहे. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढतीशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे विधानसभेला हातात हात घालून लढणारे महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक कार्यकर्ते महापालिकेत मात्र एकमेकासमोर येऊन उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट आहे.
महायुतीत प्रभागरचनेचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता
महाविकास आघाडी सत्तेत असताना मुंबईसाठी एक सदस्यीय व उर्वरित राज्यासाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याला विरोध होता. मात्र, नवी मुंबई, ठाणे या महापालिकांसाठी तीन सदस्यीय रचना अनुकूल ठरणार असल्याने तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे तीनच्या प्रभाग रचनेवर ठाम राहिले.
दरम्यान, त्यानंतर सत्तापरिवर्तन झाले व निवडणुका रखडल्या. आता पुन्हा भाजपसह महायुतीचे सरकार आले आहे. भाजप चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी आग्रही राहणार हे स्पष्ट आहे, तर पुणे व पिंपरी चिंचवडसह अन्य भागांत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे झाल्यास राष्ट्रवादीला दोन सदस्यीय प्रभाग रचना अनुकूल ठरेल, त्यामुळे महायुतीत प्रभाग रचनेचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे.