अलिहल्यानगर जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सर्वाधिकPudhari
Published on
:
25 Nov 2024, 7:51 am
Updated on
:
25 Nov 2024, 7:51 am
Ahilyanagar News: जिल्ह्यात उसासह 2 लाख 43 हजार 283 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे. सरासरी 44 टक्के पेरणीची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 1 लाख 27 हजार 73 हेक्टरवर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा आहे. जामखेड व पारनेर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली. गव्हाच्या पेरणीला अद्याप वेग आला नाही. आतापर्यंत 32 हजार हेक्टरच्या आसपास गव्हाची पेरणी झाली आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगाम देखील चांगला झाला. सध्या लहानमोठी धरणे शंभर टक्के भरलेली आहे. भूजलपातळी देखील चांगली आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामील पिके जोरदार असणार असल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातवरण आहे.
कपाशी पिकांची बहुतांश ठिकाणी अद्याप तिसरी वेचणी सुरु आहे. कापूस वेचण्यासाठी मन्युष्यबळ मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी अडचण निर्माण झाली. त्यामुळे काही ठिकाणी क्षेत्र देखील खाली झाले नाही. त्यामुळे अद्याप रब्बी पेरणीला म्हणावा असा वेग आला नाही.
रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात 5 लाख 53 हजार 328 हेक्टर क्षेत्र निश्चित असून, त्यापैकी गेल्या आठवड्यापर्यंत जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ज्वारीने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत 1 लाख 27 हजार 74 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक 39 हजार 710 हेक्टर क्षेत्रावर जामखेड तालुक्यातील पेरणीचा समावेश आहे. त्यानंतर पारनेर तालुक्यात देखील 28 हजार 227 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कर्जत तालुक्यात 15 हजार 80 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.
अहिल्यानगर तालुक्यात 14 हजार 782 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. हरबर पिकासाठी 88 हजार 376 हेक्टर क्षेत्र निश्चित आहे. त्यापैकी गेल्या आठवड्यात 36 हजार 6 हेक्टर क्षेत्रावर हरबरा पेरणी झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील 3 हजार 450 हेक्टर, जामखेड तालुक्यात 6 हजार 404, पाथर्डी तालुक्यात 3 हजार 219 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
गव्हासाठी सरासरी 86 हजार 404 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 29 हजार 872 हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला. सर्वाधिक 2 हजार 222 हेक्टर पेरा कर्जत तालुक्यात झाला आहे. राहुरी तालुक्यात देखील 4 हजार 813 हेक्टर, जामखेड तालुक्यात 2 हजार 396 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालेली आहे. मकासाठी 14 हजार 118 हेक्टर क्षेत्र आहे.
त्या तुलनेत 17 हजार 561 हेक्टर क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील 5 हजार 625, श्रीगोंदा तालुक्यातील 1 हजार 285, पाथर्डी तालुक्यातील 1 हजार 178 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. दरम्यान, नवीन ऊस लागवडीसाठी 94 हजार 693 हेक्टर क्षेत्र असून, गेल्या आठवड्यापर्यंत 30 हजार786 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.
करडई, तीळ कमी पेरा
करडई, जवस व तीळ या पिकांसाठी अत्यल्प क्षेत्र निश्चित केले आहे. करडईसाठी 360.8 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 135.7 हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी आहे. जवस पिकांसाठी 15 हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, या पिकांची पेरणी 20 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. तीळ पिकासाठी 20.2 हेक्टर क्षेत्र आहे. मात्र 22.3 हेक्टर क्षेत्रावर तिळाची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाचा पेरा 57 टक्के म्हणजे 18 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.