Published on
:
25 Nov 2024, 9:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जसप्रित बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी सामना जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. हा विजय भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठराला आहे. ज्यामुळे डब्ल्यूटीसी फायनलच्या आशा अजूनही कायम आहेत. (WTC Points Table Border Gavaskar Trophy Team India)
ऑस्ट्रेलियात सर्वात मोठा विजय
पर्थमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला. भारतीय संघाने पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 295 धावांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बुमराह (तीन विकेट) आणि मोहम्मद सिराज (तीन विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 58.4 षटकांत 238 धावांत गारद झाला. अशाप्रकारे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने यापूर्वी डिसेंबर 1977 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाचा 222 धावांनी पराभव केला होता.
पर्थ कसोटी विजय हा आशियाबाहेरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये भारताने नॉर्थ साउंड येथील कसोटीत यजमान वेस्ट इंडिज संघाचा 318 धावांनी पराभव केला होता. भारताचा आशियाबाहेरचा हा सर्वात मोठा विजय आहे.
WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल
भारताच्या पर्थ कसोटी विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या गुणतालिकेत मोठा बदल दिसून आला आहे. न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले. भारताची दुस-या स्थानी घसरण झाली आणि ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले होते. पण आता टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून पॉइंट टेबलमध्ये पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
टीम इंडिया पुन्हा अव्वल स्थानी
बॉर्डर गावस्कर मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 62.50 विजयी टक्केवारीसह अव्वल स्थानी होता, मात्र आता पर्थमधील पराभवानंतर त्यांची विजयाची टक्केवारी 57.69 झाली आहे. आता ते दुसऱ्या स्थानी घसरले आहेत. दुसरीकडे टीम इंडियाला शानदार विजयाचा मोठा फायदा झाला आहे. पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 58.30 होती, जी विजयानंतर आता 61.11 झाली आहे. यासह टीम इंडियाने पुन्हा WTC पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.