चिंचवड विधानसभा मतदारसंघात, भाजपाचे शंकर जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांच्यात थेट सामना झाला. पहिल्या फेरीपासून ते अखेरच्या 24 व्या फेरीपर्यंत जगताप यांनी मतांची आघाडी कायम राखली. त्यांच्या पारड्यात भरभरून मतदान होत असताना शेवटी त्यांना दोन लाख 35 हजार 232 विक्रमी मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 60.51 टक्के आहे. तर, कलाटे यांना एक लाख 31 हजार 458 मते (33.8 टक्के) मिळाली आहेत.
2009 साली झालेल्या पुनर्रचनेत चिंचवड मतदारसंघाची स्थापना झाली. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप हे 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा निवडून आले. त्यांना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत एक लाख 50 हजार 723 अशी सर्वाधिक मते मिळाली होती. तर, मार्च 2023 च्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना एक लाख 35 हजार 434 मते मिळाली होती. चिंचवड मतदारसंघाच्या आतापर्यंत झालेल्या एकूण पाच निवडणुकामध्ये, शंकर जगताप यांनी विक्रमी मते घेतली आहेत. तर, त्यांचे एक लाख 3 हजार 865 मताधिक्यही मोठे आहे.
जगताप यांच्या मतांचा हा विक्रम पुढील निवडणुकीत कोणी मोडेल, यांची शक्यता कमीच आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पुढील निवडणूक नव्या मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने मते कोणा उमेदवाराला मते घेता येणार नाहीत, हे स्पष्ट होत आहे.2026 मध्ये मतदारसंघांची होणार पुनर्रचना दोन वर्षांनंतर, अर्थात 2026 मध्ये देशातील लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार असल्याचे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.