श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, अलिबागमधून चित्रलेखा पाटील, महाडमधून स्नेहल जगताप, तर पनवेलमधून लीना गरड रिंगणातPudhari
Published on
:
16 Nov 2024, 4:58 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:58 am
रायगड ः रायगड जिल्हयाच्या राजकारणात महिलांचे प्राबल्य आता वाढू लागले आहे. बदलत्या राजकीय परिस्थिती महिलांना प्रमुख पक्षांकडून संधी दिली जाऊ लागली आहे. यापूर्वी शेकाप सोडल्यात इतर प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना विधानसभेवर पाठविण्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. 2019 मध्ये श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विधानसभेवर गेल्या. त्यांनी मंत्रीपदापर्यंत मजल मारली. महिलांचे राजकारणातील वाढते महत्व त्यामुळे राजकीय पक्षही महिलांना उमदेवारी देण्याचा अग्रक्रमाने विचार करू लागले आहेत. यावेळी अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि पनवेल या चार मतदारसंघांतून प्रमुख पक्षांनी महिलांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे रायगडातील महिला उमेदवारांचा सर्वत्र बोलबाला आहे.
सध्याचे राजकारण स्त्री केंद्रित होत असल्याने महिलांसाठी विविध योजना घोषित करून पूर्ण कुटुंबाची मते मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच उमेदवार प्रयत्न करीत आहेत. यात महिला उमेदवारांचे आवाहन मतदारांसाठी अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. विजयासाठी प्रत्येक पक्ष महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत. प्रत्येत जाहीरनाम्यात महिलांविषयी काही ना काही धोरण आखले जात आहे. जिल्ह्यात विधानसभेसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. यात महाड मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे, अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून चित्रलेखा पाटील आणि पनवेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या लीना गरड या प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. यासह अन्य सहा महिला उमेदवार रिंगणात आहेत. या महिला उमेदवारांना मतदारांची सहानुभती असल्याचे दिसून येत असून प्रचारातही मोठी गर्दी होत आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी 1995 मध्ये शेकापच्या रेहाना उंड्रे यांनी निवडणूक लढविली होती. श्रीवर्धनमधून राजकीय पक्षांनी महिलांना विशेष संधी दिलेली नाही. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या. यावेळी बसपाच्या सुमन सकपाळ यांनाही निवडणूक लढवीली होती. आता 2024 मध्ये पुन्हा आदिती तटकरे दुसर्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. 36 वर्षीय असलेल्या आदिती तटकरे यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत आहे. वडील खासदार सुनील तटकरे यांचा हात धरून त्या राजकारणात आल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये जिल्हा परिषद अध्यक्षापासून त्यांनी राज्यात मंत्रिपदापर्यंत मजल मारत स्वताचे कर्वृत्व सिद्ध केले आहे. राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांच्याच महिला व बाल विकास विभागामार्फत सुरु झाली आहे. यावेळी श्रीवर्धनमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीचे अनिल नवगणे व काँग्रेस बंडखोर अपक्ष राजेंद्र ठाकूर दोन उमेदवारांच्या मतविभागणीमुळे आदिती तटकरे यांचा विजय सोपा वाटत आहे.
रायगड जिल्हयात अलिबाग विधानसभा मतदारसंघात महिलांना सर्वाधिक वेळ उमेदवारी करण्याची संधी मिळाली आहे. शेकापने ती दिली आहे. 1952 मध्ये काँग्रेसने मनोरमा भिडे यांना उमेदवारी दिली होती मात्र विजयी होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009 अशा सलग चार वेळा शेकाप माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांना तीन वेळा निवडून आणले. 2019 मध्ये काँग्रेसने अॅड. श्रद्धा ठाकूर यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. यावेळी अलिबाग मतदारसंघातून शेकापने चित्रलेखा नृपाल पाटील यांना संधी दिली आहे. 37 वर्षीय चित्रलेखा पाटील यांचे बॅचलर ऑफ मास मीडियाचे उच्च शिक्षण आहे. शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांच्या त्या स्नुषा असल्याने त्यांना राजकारणाचा वारसा आहे. अलिबाग नगरपरिषदेवर नगरसेविका असलेल्या पाटील यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. चित्रलेखा पाटील यांची पहिलीच विधानसभा निवडणूक आहे, तरी पक्षाची निश्चित बोटबँक, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांची मते आणि महायुतीतील दिलीप भोईर यांची बंडखोरीमुळे महायुतीच्या मतांचे विभाजन या गोष्टी चित्रलेखा पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर करण्याची शक्यता आहे.
महाड विधानसभा मतदारसंघातून महिलांना संधी मिळालेली नाही. यावेळी महाआघाडीतून शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल माणिक जगताप निवडणूक लढवित आहेत. प्रथमच सरळ लढतीत महिला उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे यावेळी ही वेगळी निवडणूक ठरणार आहे. 35 वर्षीय स्नेहल जगताप बीएससी आहेत. माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणाचा वारसा आहे. नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाच्या कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. यावेळी त्यांची लढत महायुतीचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्याबरोबर आहे. त्यामुळे जगताप यांना मोठे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सुनील तटकरे यांना फक्त 3 हजारांचे मताधिक्य मिळाले असल्याने आता गोगावले यांनाही निवडणूक सोपी राहिलेली नाही.
पनवेल विधानसभा मतदारसंघातही प्रमुख पक्षांनी महिलांना आतापर्यंत विशेष संधी उमेदवारी मिळालेली नाही. मनिषा पळसकर यांना राष्ट्रीय समाज पक्षाने काही वर्षापूर्वी उमेदवारी दिली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाने लीना अर्जुन गरड या 46 वर्षीय बीएससी उच्च शिक्षित कार्यकर्तीला उमेदवारी दिली आहे. त्याही उच्च शिक्षित आहेत. मात्र महाविकास आघाडीतील येथे बिघाडी असल्याने शेकापचेही माजी आमदार बाळाराम पाटील हेही निवडणूक रिंगणात आहेत. तर महायुतीचे तुल्यबळ असे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर विरोधात आहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीत गरड यांचा कस लागणार आहे.
महिला उमेदवारांच्या लढतींकडे लक्ष
रायगड जिल्ह्यातील उर्वरित उरण, पेण, कर्जत विधानसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांनी वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमधून महिलांना विशेष संधी दिलेली नाही, असे आतापर्यंत दिसून आले आहे. मात्र अलिबागमध्ये शेकापने तर श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी महिलांना दिली. या दोनही मतदारसंघात महिला उमेदवारांनी पहिल्याच संधीत विजय मिळविला आहे. यावेळी होत असलेल्या निवडणुकीत चार प्रमुख पक्षांनी चार महिला उमेदवार रिंगणात उतरविले आहे. तुल्यबळ अशा उमेदवारांचा त्या कशा प्रकारे सामना करतात याकडे सर्व जिल्हयात लक्ष लागले आहे.