विधानसभा निवडणुकीचा मतदारांचा डेटा, प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये फरक आढळून दिसून येत आहे. Pudhari Photo
Published on
:
28 Nov 2024, 5:14 am
Updated on
:
28 Nov 2024, 5:14 am
रायगड : विधानसभा निवडणुकीचा मतदारांचा डेटा, प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये फरक आढळून दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमधील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील मतदानाची आकडेवारी आणि जिल्हा स्तरावर मतांची आकडेवारी यामध्ये फरक दिसून येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मते, रायगड जिल्ह्यात सात मतदारसंघांमध्ये अंतिम मतदान 69.15 टक्के होते. जिल्ह्यात एकूण मतदार 17 लाख 21 हजार 38 इतके होते. त्यापैकी 17 लाख 28 हजार 302 प्रत्यक्षात मतदान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मतदानात 7 हजार 264 इतकी वाढीव मते आढळून आली आहेत.
अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 6 हजार 230 मतदार असून, त्यापैकी निवडणूक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 लाख 36 हजार 244 मतदारांनी मतदान केले. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारांना मिळालेले मतदान 2 लाख 38 हजार इतके आहे. याचा अर्थ, यामध्ये 1 हजार 756 मतदार वाढीव असल्याचे दिसून आले आहे.
कर्जत मतदारसंघामध्ये एकूण मतदार 3 लाख 18 हजार 742 असून, त्यापैकी 2 लाख 40 हजार 10 जणांनी मतदान केले. मात्र, मतपेटीत 2 लाख 39 हजार 999 इतकीत मते पडली आहेत. उर्वरित 11 मते गेली कुठे, असा सवालही उपस्थित होत आहे. उरण मतदारसंघामध्ये 3 लाख 42 हजार 101 मतदार असून त्यापैकी 2 लाख 62 हजार 747 जणांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. परंतु, प्रत्यक्षात उमेदवारांना 2 लाख 63 हजार 548 मते मिळाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे 801 वाढीव मते आहेत. श्रीवर्धन मतदारसंघामधील मतदारांची संख्या 2 लाख 65 हजार 286 इतकी असून, त्यापैकी 1 लाख 62 हजार 794 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे असताना प्रत्यक्षात मोजणीदरम्यान 1 लाख 63 हजार 939 मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे.
महाड मतदारसंघात 2 लाख 96 हजार 388 इतके मतदार असून, त्यापैकी 2 लाख 12 हजार 16 इतक्या मतदारांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. मात्र, उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज 2 लाख 13 हजार 325 इतकी असल्याचे दिसून येते. पेण मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 7 हजार 979 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 24 हजार 892 मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान केले. त्यानुसार 2 लाख 26 हजार 527 इतकी मते उमेदवारांना मिळाली असून, 1 हजार 635 इतकी मते अधिकची आहेत.
पनवेल मतदारसंघामध्ये 6 लाख 52 हजार 62 एकूण मतदार असून, त्यापैकी 3 लाख 82 हजार 335 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. त्यानुसार या मतदारसंघातील उमेदवारांना 3 लाख 82 हजार 964 इतकी मते मिळाली आहेत. दरम्यान, 629 इतकी मते अधिकची आहेत.
याबाबत निवडणूक आयोगाकडे त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अनेक मतदारसंघांमध्ये अस्तित्वात असल्याने निकालांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी काटेकोरी तपासणी करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाले आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनबाबत शंका घेतली जात आहे.
मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष अहवाल पाठवित असतात, तो तोंडी दिला जातो. त्या आकडेवारीत मागे-पुढे होऊ शकते. एक-दोन मतांचा फरक असू शकते. मात्र अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाची मतदान आणि मतमोजणीच्या आकडेवारी तंतोतंत जुळलेली आहे. अलिबाग-मुरुडचे 1750 टपाली मतदान होते. त्यामुळे हा फरक वाटू शकतो.
- मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग विधानसभा मतदारसंघ