Radhakrishn Vikhe Patil connected Bacchu Kadu : प्रहारचे नेते बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये, अशा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांच्याबाबतचं विधान केलं आहे. तसंच विधानसभेच्या निवडणुकीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
बच्चू कडू, नेते प्रहारImage Credit source: Facebook
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. त्यापैकीच एक म्हणजे प्रहारचे नेते बच्चू कडू… अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बच्चू कडू घेणार राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा बुलढाण्याच्या शेगावमध्ये मेळावा घेणार आहेत. सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत. त्याआधीच बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.
“बच्चू कडूंना महायुतीत घेऊ नका”
राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला आहे. बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिलं. धोरण मान्य केली. दिव्यांगाची धोरण मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चू कडू यांनी जो विश्वासघात दाखवला. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामिल करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे, विखे पाटील म्हणालेत. मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.