Ranji Trophy 2025: मुंबईची पावले बाद फेरीच्या दिशेने, दुबळ्या मेघालयाला 86 धावांत गुंडाळले

2 hours ago 1

मुंबईचा रणजी करंडकाचा सामना घरच्या मैदानावर सुरू असला तरी सर्वांच्या नजरा लागल्या होत्या वडोदऱ्याच्या रिलायन्स स्टेडियमवर. तरीही मुंबईने रणजी करंडकाच्या अखेरच्या साखळी लढतीच्या पहिल्याच दिवशी दुबळय़ा मेघालयाचा अवघ्या 86 धावांत गाशा गुंडाळत आपली पावले बाद फेरीच्या दिशेने टाकली आहेत. मुंबईचा डावाने विजय निश्चित मानला जात असला तरी मुंबईचे भवितव्य वडोदऱयात सुरू असलेल्या सामन्याच्या निकालावरच अधिक अवलंबून आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे (83), सिद्धेश लाड (89) हे दोघे खेळत होते.

शार्दुलची हॅटट्रिक

गेल्या सामन्यात आपल्या झुंजार फलंदाजीसह भेदक मारा करणार्या शार्दुल ठाकूरने आज आपल्या पहिल्याच षटकात शून्यावर मेघालयाच्या निशांत चक्रबर्तीची विकेट काढली आणि त्यानंतर आपल्या दुसऱयाच षटकात सलग तीन चेंडूंवर बालचंदर अनिरुद्ध, सुमीत कुमार आणि जसकिरत सिंग सचदेवा याची विकेट उखडवत आपली पहिली हॅटट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे त्याने आपल्या नऊ चेंडूंत अवघी एक धाव देत 4 फलंदाज बाद करण्याचा पराक्रम केली. रणजी क्रिकेटच्या इतिहासात शार्दुल हॅटट्रिक घेणारा पाचवा मुंबईकर ठरला आहे. याआधी जहांगीर खोत 1943-44), उमेश कुलकर्णी (1963-64), अब्दुल ईस्माइल (1973-74)आणि रॉयस्टन डायस (2023-24) यांनी हॅटट्रिक साजरी केली होती. तसेच या रणजी मोसमातील ही दुसरी हॅटट्रिक असून हिमाचल प्रदेशच्या ऋषी धवनने पुद्दुचेरीविरुद्ध हॅटट्रिक केली आहे.

मेघालयाची 6 बाद 2 अशी दुर्दशा

मुंबईने मेघालयाचा पहिला डाव पहिल्याच सत्रात गारद केला असला तरी पहिल्या 19 चेंडूंतच त्यांची 6 बाद 2 अशी दुर्दशा केली होती. रणजी क्रिकेटच्या इतिहासात इतका भयावह धावफलक कुणाचाही नव्हता. शार्दुलने 1 धावेत 4 विकेट टिपल्या तर मोहित अवस्थीनेही अवघी एक धाव देत 2 विकेट घेतल्या. या दोन धावासुद्धा एकटय़ा अर्पित भटेवराच्या होत्या. उर्वरित आघाडीच्या पाचही फलंदाजांना आपला भोपळासुद्धा पह्डता आला नव्हता. ही भयानक अवस्था पाहिल्यानंतर मेघालयाचा डाव एकेरी धावसंख्येतच बाद होतो की काय अशी भीती वाटत होती. मात्र मेघालयाच्या प्रिंगसंग संगमा आणि आकाश चौधरी यांनी सातव्या विकेटसाठी 38 धावांची तर अनिक चरक आणि हिमान फुकान यांनी नवव्या विकेटसाठी 42 धावांची भागी रचल्यामुळे मेघालय 86 धावांपर्यंत पोहचू शकला. मेघालयाच्या धावसंख्येत हिमान फुकानने सार्वाधिक 28 धावा ठोकल्या.

लाड-रहाणेची 170 धावांची भागी

मुंबईला मेघालयाविरुद्ध डावाने विजय मिळवणे अनिवार्य आहे. मुंबईनेही त्याच विजयाला साजेशी कामगिरी करताना मेघालयाचा डाव 86 धावांत संपवला आणि त्यानंतर सिद्धेश लाड (89) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (83) यांनी तिसऱया विकेटसाठी 170 धावांची अभेद्य भागी रचत मुंबईला 127 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर सामन्याच्या दुसऱया दिवशी 300-400 धावांची आघाडी घेत मुंबई मेघालयाला फलंदाजी देत सामना तिसऱया दिवशी डावाने जिंकेल. या कामगिरीमुळे मुंबईचे आव्हान जिवंत राहिल, पण बाद फेरीचा फैसला बडोद्याच्या पराभवानंतरच होईल. मात्र बडोदा आणि जम्मू आणि कश्मीर यांच्यातील लढत अनिर्णितावस्थेत सुटली तर मुंबईचे आव्हान आपोआप संपुष्टात येईल. त्यामुळे बडोद्याचा विजय किंवा जम्मू आणि कश्मीरचा पराभव मुंबईच्या पथ्यावर पडू शकतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article