मुंबई नाशिक महामार्गांवरील कसारा घाट ते उंबरमाळी दरम्यान अपघातPudhari News Network
Published on
:
18 Nov 2024, 10:29 am
Updated on
:
18 Nov 2024, 10:29 am
कसारा : मुंबई नाशिक महामार्गांवरील कसारा घाट ते उंबरमाळी दरम्यान रविवार (दि.17) रोजी रात्री पासून सोमवारी (दि.18) सकाळ पर्यंत अवघ्या 15 तासात 4 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात 4 मयत तर 2 जण गभीर जखमी झाले आहेत. 4 पैकी 3 अपघात हे मुंबई नाशिक महामार्गावरील ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचे समोर आले असून एक अपघात दुचाकी स्लीप झाल्यामुळे घडला आहे.
मुंबई नाशिक महामार्गांवरील कसारा घाटातून रविवार (दि.17) रात्री 9 च्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना दुचाकी एका स्पीड ब्रेकरवर आदळली व दुचाकीस्वाराचा ताबा सुटून दुचाकी थेट कसारा घाटातील दरीत कोसळली. या अपघातात दिनेश साहू व उत्तम उंबरकर हे गभीर जखमी झाले आहेत.
त्यानंतर काही वेळातच उंबरमाळी जवळील पेठ्याचा पाडा या फाट्यावर पेठ्याचा पाड्यातील दोन तरुण दुचाकीवरून महामार्ग ओलांडून घरच्या रस्त्याकडे जात असताना एका अज्ञात ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दुचाकी वरील अनिल पारधी व बाळू झुगरे हे रस्त्यावर पडले. या अपघातात अनिल पारधी याचा जागीच मृत्यू झाला तर बाळू झुगरे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार (दि.17) मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी कसारा घाटाच्या पायथ्याशी पोहचलेल्या दूध टँकरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. टँकर थेट पलटी होऊन 200 फूट खाली कोसळला. या अपघातात मधुकर नायकवाडी (रा.संगमनेर) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
चौथ्या अपघात सोमवारी (दि.18) सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन कसारा घाटातील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने नाशिकहून मुंबई कडे जाणारा आयशर टेम्पो एका कटेनरवर आदळला. या अपघातामध्ये आयशर टेम्पो चालक वाहनाच्या केबिनमध्ये अडकल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाने महामार्ग पोलीस, कसारा पोलीस, टोल पेट्रोलिंग टीमने अडकलेल्या चालकास बाहेर काढून उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले, परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान याप्रकरणी कसारा पोलीस पुढील तपास करीत आहेत
अपघात ग्रस्ताना तत्काळ मदत..
दरम्यान मुंबई नाशिक महामार्गा वरील या 4 अपघाता दरम्यान आपघात ग्रस्ताना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शाम धुमाळ, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, दत्ता वाताडे, जसंवींदर् सिंग, बाळू मांगे, कैलास गतीर, भरत धोंगडे, गणेश भांगरे, नाना बोऱ्हाडे, सुनील करवर, अक्षय लाडके ,सतीश खरे यांच्या सह महामार्ग पोलीस, कसारा पोलीस, टोल पेट्रोलिंग, नरेंद्र महाराज रुग्णवाहिका यांनी आपघात ग्रस्ताना तत्काळ मदत करून त्यांना गोल्डन आवर्स मध्ये रुग्णालयात दाखल केले होते. परंतु गभीर दुखापत व कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या प्राथमिक उपचार सुविधेमुळे जखमीना योग्य उपचार मिळू शकले नाही.
ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे अपघात
दरम्यान कसारा घाटातील अपघात व कसारा गावाजवळील अपघात हा मुंबई नाशिक महामार्गावर दुरुस्तीचे व उड्डाणं पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी मुळे झाल्याचे बोलले जात आहे. कसारा घाटात तीव्र उत्तार व वळणदार रस्त्यावर मोठे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालक भरधाव वेगात असताना त्यांना स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नाही. त्यामुळे स्पीड ब्रेकरवर वाहने एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. या स्पीड ब्रेकर ऐवजी रुंबल स्ट्रीप बसवले असते तर अपघात टळले असते. दुसरीकडे कसारा वाशाला फाट्यावर उड्डाणं पुलाचें काम करणाऱ्या ठेकेदाराने पुलावरील रस्ता बंद ठेवल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे ब्रेक फेल झालेला टँकर चालकाने इतर वाहनांना वाचवण्यासाठी टँकर इतरत्र वळवणे आवश्यक आहे. परंतु वाहतूक कोंडी मुळे चालकाचे नियंत्रण सुटले व टँकर थेट दरीत कोसळला.