Published on
:
01 Oct 2024, 9:07 am
Updated on
:
01 Oct 2024, 9:07 am
नगर : पुढारी वृत्तसेवा
इंग्रजी शाळांच्या तुलनेत झेडपीच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता सकारात्मक होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या भौतिक, शैक्षणिक सुविधांसाठी वेगवेगळ्या निधीसोबतच मिशन आपुलकीतूनही अनेक हात आता पुढे येत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस झेडपीच्या शाळाही डिजीटलकडे घोडदौड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी अंतर्गत इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषदेच्या ७० शाळांना १४०० टॅब व ५० शाळांना १०० स्मार्ट टीव्ही देण्यात येत आहेत. याअंतर्गत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष येरेकर यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले.
यावेळी 'इन्फोसिस'चे संतोष आनंथपुरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी राजश्री घोडके, लेखाधिकारी रमेश कासार आदी उपस्थित होते. सीईओ येरेकर या वेळी म्हणाले, की आधुनिक शिक्षण पद्धतीत डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच 'इन्फोसिस'ने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. आनंथपुरा म्हणाले, की ग्रामीण E भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सामाजिक बांधिलकीतून कंपनीने टॅब वितरण सुरू केले आहे.
त्याचा सर्व शाळांनी चांगल्या पद्धतीने उपयोग करावा. रमेश कासार म्हणाले, मिशन आपुलकी अभियानात सन २०२२ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ३५ कोटींच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. विलास साठे यांनी सूत्रसंचालन केले.