अजित पवारांना पुण्यातच मोठा धक्का!:शहराध्यक्षासह 600 जणांनी दिला राजीनामा, रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप

2 days ago 1
राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 आमदारांची शपथविधी दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला आहे. यात 7 जणांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते व छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली, शिंदे गटाच्या नेत्या व माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. मात्र यावर आता अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त करत थेट 600 जणांना सोबत घेत राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी तब्बल 600 जणांना सोबत घेत राजीनामा दिला असल्याने पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने दीपक मानकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. मला इतरांसारखे पुढे पुढे करता येत नाही दीपक मानकर म्हणाले, मी 2012 पासून पक्षाचे काम करत आहे. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवडे यांना संधी दिली, मग मला का नाकारण्यात आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मला इतरांसारखे पुढे पुढे करता येत नाही. कार्यकर्त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत. मी स्वतः राजीनामा देतो. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तत्परता दाखवली, ती आमच्याबद्दल का दाखवली नाही, असा प्रश्न देखील दीपक मानकर यांनी उपस्थित केला. पंकज भुजबळ यांना संधी दिली पण मला मात्र डावलले पुढे बोलताना दीपक मानकर म्हणाले, भुजबळांच्या घरात सगळी पद दिली तर इतर कार्यकर्त्यांना संधी कधी देणार. मी शनिवारपर्यंत हा राजीनामा अजित पवारांकडे देणार आहे. दीपक मानकरांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी मागणी पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी केली होती. अजित पवारांच्या हातात हे सगळं असून पंकज भुजबळ यांना संधी दिली पण मला मात्र डावलले, अशा शब्दात दीपक मानकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. संधी द्यायची नव्हती तर मला सांगायला पाहिजे होते दीपक मानकर पुढे म्हणाले, रुपाली चाकणकर आणि मला महानगरपालिकेचे तिकीट द्या, मग कोणाची ताकद किती आहे हे तुम्हाला कळेल. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. मला इतर पक्षांमधून ऑफर येत आहेत. पण मी अजित पवारांसोबत राहणार. पण जर मला संधी द्यायची नव्हती तर मला सांगायला पाहिजे होते, आम्ही जर ठरवले तर निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो, असा इशारा दीपक मानकर यांनी दिला आहे. पंकज भुजबळ यांचे मेरिट काय? रूपाली चाकणकर यांना उद्देशून बोलताना दीपक मानकर म्हणाले, तुमच्या कार्यकर्तीला तुम्ही ताकद देता, तसे आम्हाला देता येत नाही का? त्या 24 तास तुमच्यासोबत असतात म्हणून त्यांचीच बाजू घेणार का? पंकज भुजबळ यांचे मेरिट काय? आम्ही काय हमाल्या करायला बसलोय का? असा संतप्त सवाल दीपक मानकर यांनी उपस्थित केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article