उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने गुरुवारी अटक वॉरंट जारी केले. टेंडर मिळवण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी अदानींवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावरून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपच्या अन्यायाला पंटाळून मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी आपल्या सहकाऱयांसह आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अदानी घटनेवरून भाजपवर शरसंधान केले. 19 तारखेला वसई-विरारमध्येही नोटांचा बॉम्ब फुटला होता, तोदेखील लोकांनी पाहिलेला आहे, पण अदानी बॉम्बने देशच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घोटाळा कसा होऊ शकतो? असा सवाल उपस्थित करतानाच आता या घोटाळेबाजाचे काय करणार? असा प्रश्न पेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला विचारला पाहिजे, असे ते म्हणाले.
उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता आहे. सचिन शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता त्यांच्यावर अन्यायदेखील झाला नाही पाहिजे आणि न्यायदेखील मिळाला पाहिजे. शिवसेनेत आल्याचा त्यांना पश्चात्ताप होणार नाही, असा शब्द मी देतो. मात्र आपण जनतेला काय देऊ शकलो आणि त्यांचे समाधान हा मोठा न्याय असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.