अनिल देशमुखांवरील हल्ला प्रकरण:‘एआय’च्या माध्यमातून ‘रिक्रिएशन’, फॉरेन्सिक पथकाकडून देखील तपास
2 days ago
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री बेलफाटाजवळ झालेल्या दगडफेकीची घटना पोलिसांनी गंभीरतेने घेतली आहे. रात्रभर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. देशमुख यांच्यावर चौघांनी हल्ला केला होता व त्यानंतर ते भारसिंगीच्या दिशेने फरार झाले. पोलिसांनी मंगळवारी संबंधित घटनेचे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून ‘रिक्रिएशन’ केले. तांत्रिक माध्यमातून तपासावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील उपस्थित होते. अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली तेव्हा ते समोर बसले होते. पोलिसांचे दोन सुरक्षारक्षक मागच्या वाहनात होते. घटना घडली तेव्हा वाहनाची गती कमी होती. यावेळी चार जण समोर आले. त्यांनी फेकलेला साडेसात किलो वजनाचा दगड समोरील काचेवर पडला तर दुसरा दगड मागील दाराच्या खिडकीतून फेकून मारण्यात आला. या दगडफेकीत देशमुख जखमी झाले होते. देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणी घडलेल्या घटनेसंदर्भात काटोल पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे रस्ता अडविणे, इतरांची सुरक्षितता धोक्यात आणने, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. तपासात ‘एआय’चा उपयोग आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक कशी झाली, याचे रिक्रिएशन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. तसेच परिसरातील मोबाईल टॉवरच्या माध्यमातून देखील परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल क्रमांकांचा डेटा एकत्रित करण्यात येत आहे. त्या परिसरात होत असलेल्या मोबाईल कॉल्सचा या माध्यमातून अभ्यास करण्यात येईल. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकानेदेखील सॅम्पल परीक्षणासाठी नेले आहेत, असे हर्ष पोद्दार यांनी स्पष्ट केले. काटोलमध्ये पोलिस बंदोबस्त काटोलमधील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस कुमक लावण्यात आली आहे. एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निर्धास्तपणे मतदान करावे असे आवाहन दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. पोलिस कर्मचाऱ्यांची होणार चौकशी अनिल देशमुख यांना नागपूर शहर आणि ग्रामीण भागात पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही सुरक्षारक्षकांनी देशमुख यांच्याजवळ बसणे अपेक्षित होते. मात्र घटना घडली तेव्हा सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस जवान मागच्या गाडीत बसले होते. त्यांच्या या कृतीची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)