पाठारे प्रभूंची अभिमानास्पद वाटचाल दर्शवणारा अनोखा महोत्सव लोणावळय़ात रंगला. पाठारे प्रभू समाजातील विविध चालीरिती, खाद्यसंस्कृती-वेशभूषा, विविधांगी परंपरेचे दर्शन यानिमित्ताने झाले.
पाठारे प्रभू समाजाचा पहिला महोत्सव 1938 साली झाला. आता तब्बल 86 वर्षांनंतर 14 ते 17 नोव्हेंबरदरम्यान लोणावळा येथील रत्नमाला धुरंधर यांच्या सेरेनिटी रिसॉर्टमध्ये महोत्सव साजरा झाला. याअंतर्गत समाजाचा समृद्ध वारसा, पारंपरिक संस्कृती, अडली, पडली, तपेली, लगडी, शेर, पावशेर, ज्न्या काळात वापरण्यात येणारी धान्य मोजण्याची भांडी, जुनी चूल, शेवारे अशा अनेक वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले. चित्र प्रदर्शन, फूड फेस्टिव्हल, पुस्तकांचे प्रकाशन, सेलिब्रेटींच्या मुलाखती, महिलांच्या मुलाखती, नृत्य-गायन सादर झाले.
फूड फेस्टिव्हलमध्ये पाठारे प्रभूच्या पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी मिळाली. स्मृती तळपदेने ‘अभंगवारी’ आणि ‘इये परभांचिया नगरी’ हा नृत्याविष्कार सादर केला. एका विशेष फॅशन शोचे आयोजनही करण्यात आले. यामध्ये मारवाड, राजस्थान, गुजरात असे स्थलांतर करत मुंबईत स्थायिक झालेल्या पाठारे प्रभूंच्या वेशभूषा सादर करण्यात आल्या.
महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे, नीलिमा कोठारे, स्मिता जयकर, सॉलिसिटर मोहन जयकर, भरत दाभोळकर, कुणाल विजयकर, डॉ. विठ्ठल कामत आदी मान्यवर सहभागी झाले. यावेळी उज्ज्वला व जयश्री गोरक्षकर लिखित ‘सिलेक्शन्स फ्रॉम दी गृहिणीमित्र’ या इंग्रजी पुस्तकाचे आणि सॉलिसिटर राजन जयकर यांच्या ‘ब्रीफ स्टोरीज ऑफा पाठारे प्रभूज’ या पुस्तकांचे प्रकाशन ‘प्रभू प्रभात’च्या संपादिका वृंदा जयकर यांच्या हस्ते झाले.