Published on
:
22 Nov 2024, 11:31 pm
Updated on
:
22 Nov 2024, 11:31 pm
एपिलेप्सी (अपस्मार / फेफरे येणे) हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा (मेंदूचा विकार) एक प्रकार आहे. यामुळे अपस्माराचे झटके येऊ शकतात. रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बर्याचदा शुद्ध हरपते. वेळीच लक्ष देऊन या परिस्थितीचे व्यवस्थापन करणे ही गरज असते.
अपस्माराच्या लक्षणांमध्ये शुद्ध हरपणे, स्नायूंचा ताठरपणा, अचानक कोसळणे आणि हाता-पायांना मुंग्या येणे, ज्ञानेंद्रियांवर परिणाम होणे, भीती वाटणे आदींचा समावेश होतो. काही लोकांना झटका आलेल्या काळात काय घडले हे देखील आठवत नाही. अपस्मार केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही, तर भावनिक आरोग्यावरही परिणाम करतो. यामुळे अपस्माराच्या आव्हानांचा सामना करत सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते.
औषधे वेळेवर घ्या : औषधांचे डोस वगळणे टाळा. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर घेत असल्याची खात्री करावी. ही औषधे अपस्माराच्या झटक्याची तीव्रता कमी करण्यात मदत करू शकतात. औषधे वगळल्याने प्रकृती बिघडू शकते आणि नेहमीपेक्षा जास्त वेळा झटके येऊ शकतात. गोळ्या घेणे विसरत असाल, तर तुमच्या फोनवर अलार्म किंवा रिमाईंडर सेट करून ठेवावा.
अपस्माराचे झटके येत असताना सुरक्षित राहा: अपस्माराच्या झटक्यांचा अंदाज लावणे जवळजवळ अशक्य होते. कोणत्याही क्षणी झटके येऊ शकतात. ज्यामुळे शारीरिक दुखापतींचा धोका वाढू शकतो. या जखमा सौम्य ते गंभीर असू शकतात. अशावेळी सुरक्षित राहण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी घरात काही बदल करा, जसे की अणकुचीदार कोपरे झाकणे. हल्ली बाजारात मेडिकल अलर्ट ब्रेसलेट सहज उपलब्ध आहेत जे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आपल्या कुटुंबाला किंवा प्रियजनांना कळवू शकतात. हे दुखापतींचा धोका कमी करण्यात मदत करू शकते.
पुरेशी झोप घ्या : पुरेशी झोप न मिळाल्याने तुम्हाला झटके येऊ शकतात. तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुमच्या झोपेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. कमीतकमी 8 ते 9 तासांच्या शांत झोपेचे लक्ष्य ठेवा. दररोज एकाच वेळी झोपणे आणि रात्रीची निरोगी दिनचर्या स्थापित करण्याचा प्रयत्न करा. डिजिटल स्क्रीन वापरणे टाळावे किंवा झोपण्यापूर्वी टीव्ही पाहणे टाळा.
तणावाचे व्यवस्थापन करा : तुमच्या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम, योगा आणि ध्यान यासारख्या सोप्या तंत्रांचा समावेश करू शकता. यामुळे तुमचे मन शांत होते आणि तुमची तणावाची पातळी हळूहळू कमी होते. फिरायला जाणे, तुमचे आवडते खाद्यपदार्थ खाणे, आवडता कार्यक्रम पाहणे आणि रोजनिशी लिहिणे यासारख्या गोष्टी आनंदी व तणावमुक्तराहण्यास मदत करतात.