अवैध व्यवसायाशी लागेबांधे प्रकरणी गेवराईच्या २ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनFile Photo
Published on
:
31 Jan 2025, 9:08 am
Updated on
:
31 Jan 2025, 9:08 am
गेवराई : पुढारी वृत्तसेवा
अवैध व्यवसायाशी लागेबांधे ठेवत आर्थिक उलाढाल केल्या प्रकरणी गेवराईच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाळूत तडजोड करून आपला आर्थिक फायदा करत असल्याचे उघडकीस आल्याने बीडचे एसपींनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून अवैध वाळू उपशावर पायबंद घालण्याचा पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांनी ठोस पावले उचललेली आहेत. काही दिवसांपुर्वी एका कर्मचाऱ्याची बदली करून अवैध वाळू उपसा करणा-यांना एक प्रकारे ईशारा दिला होता. गुरुवारी (ता ३०) गेवराई पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार बलराम सुतार व पोलीस हवालदार अशोक हंबर्डे या कर्मचाऱ्यांना वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश असताना देखील वाळूसह वाहने ताब्यात न घेता फक्त वाहने ठाण्यात आणली. एवढेच नाहीतर गुन्हा दाखल करण्यात वेळकाढूपणा करत संशयित आरोपीला साथ दिल्याने एसपी नवनित कॉवत यांनी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. आता यापुढे कर्तव्याशी प्रमाणिक न राहणा-या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा एक ईशारा असल्याचे कारवाईच्या निमित्ताने एसपी नवनित कॉवत यांनी दाखवून दिले आहे.
दिवसेंदिवस गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा चालू आहे. या अवैध वाळू उपशामुळे अनेक जणांचे जीव गेले, परंतु हा अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक काही केल्या बंद होत नसून दिवसा, रात्री खुलेआम हायवा सुसाट पळताना दिसत आहेत. या वर एसपी अंकुश ठेवू शकतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.