Published on
:
31 Jan 2025, 11:44 am
Updated on
:
31 Jan 2025, 11:44 am
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - येत्या 2026-2027 मध्ये पुन्हा एकदा कुंभमेळा भरत आहे. दीड ते दोन वर्षांनी कुंभमेळा भरत आहे. मी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आग्रह धरला होता. तसेच कुंभमेळ्यात मंत्री देखील राहिलो आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांचे म्हणणे आहे की, सगळे सुरळीत व्हावयाचे असेल तर पालकमंत्री मला ठेवा. कुंभमेळ्याचं मोठं चॅलेंज असतं. गेल्या वेळेपेक्षा दुप्पट संख्येने भाविक यावेळी येतील. गेल्यावेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केला होता. या वेळेला तशीच परिस्थिती राहिली तर काम अधिक सोयीचे होईल म्हणून आम्ही नाशिकच्या पालकमंत्री पदाची मागणी केली होती आणि तशा प्रकारे निर्णय जाहीर झाला होता. मात्र, नंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु आहे. मला वाटते दोन ते तीन दिवसांमध्ये हा तिढा सुटायला हवा, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजन यांनी सांगितले की, नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षाची मागणी आहे. तीनही पक्षाचे नेते नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी माझ्या नावाची घोषणा झाली होती. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली. महायुतीमधील तिन्ही नेते यासंदर्भात चर्चा करत आहेत. त्यामुळे हा तिढा लवकरच सुटेल, असं गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
महायुतीमधील तीनही पक्ष तोला मोलाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, आपण पालकमंत्री व्हावे, आता गेल्यावेळी 2014 ते 2019 दरम्यान कुंभमेळा होता. त्यावेळी मी पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री होतो. त्यानंतर पुन्हा सरकार आल्यानंतर दादा भुसे यांना पालकमंत्री केले होते. तेव्हाही पालकमंत्री पदाचा विषय लांबलेला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मीच सांगितले होते की दादा भुसे जी यांना पालकमंत्री करावे, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री पदावरुन देण्यात आली स्थगिती
महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर राजकारण तापले. नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील पक्षात रस्सीखेच सुरु आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे हे इच्छुक आहेत. मात्र, नाशिकचे पालकमंत्री पद हे भाजपाचे गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते तर रायगडचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित केला. त्यामुळे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेले आहे. यावर आता भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. आता दीड दोन वर्षांनी कुंभमेळा आहे. त्यामुळे मी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आग्रह धरला होता, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.