आचारसंहितेमुळे अनधिकृत होर्डिंग, बॅनर, अतिक्रमणांवर कारवाई:मनपा उपायुक्‍तांची विविध ठिकाणी पाहणी

2 hours ago 1
आचारसंहितेमुळे महापालिका अॅक्शन मोडवर आली असून, शहरातील राजकीय पक्षांच्या जाहिराती, नेत्यांच्या जाहिरातींचे अनधिकृत होर्डिंग, फलक काढण्याची कारवाई करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसोबत मनपा विविध ठिकाणी सरकारी योजना आणि राजकीय पक्षांच्या जाहिराती काढण्यास सुरुवात केली आहे. मनपाने पाचही झोनसाठी पथके तयार केली आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर गुरुवारी शहरातील विविध ठिकाणच्या जाहिराती काढण्याचे काम सुरू केले. शहरातील विविध परिसरात सतत फेऱ्या मारून जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश उपायुक्‍त डॉ. मेघना वासनकर यांनी दिले आहेत. उपायुक्‍त वासनकर यांनी दैनंदिन साफ सफाई, अ‍नधिकृत होर्डिंग व बॅनर, अतिक्रमण काढण्याच्‍या अनुषंगाने इतवारा बाजार, जिल्‍हाधिकारी कार्यालय, गाडगेनगर, पंचवटी, शेगाव नाका, विलास नगर, नागपुरी गेट, लालखडी, इर्विन चौक परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्‍यान सहायक आयुक्‍त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, सुभाष जानोरे, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्‍हाण, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे, पोलिस व मनपा कर्मचारी उपस्थित होते. या पाहणी दरम्‍यान दैनंदिन वर्गीकृत कचरा संकलन करणे, दैनंदिन व्यावसायिक, खासगी क्षेत्रात रात्री साफ सफाई, नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणाचे सौंदर्यीकरण, शेणखत उचलणे, नाल्यांची नियमित साफ सफाई करणे, प्लास्टिक बंदी मोहीम राबवणे तसेच दंडात्मक कारवाई करण्‍याचे निर्देश उपायुक्‍तांद्वारे देण्यात आले. रस्‍त्‍यावर झाडांच्‍या फांद्या आढळून आल्‍यास उद्यान विभाग व स्‍वच्‍छता विभाग यांनी समन्‍वय साधून कारवाई करावी. घंटागाडी नियमितपणे घरोघरी पाठवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. हॉकर्सला डस्‍टबिन ठेवणे अनिवार्य करावे. डस्‍टबिन न ठेवल्‍यास त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे निर्देश उपायुक्‍तांनी दिले. कामात हयगय झाल्यास प्रशासकीय कारवाई मनपा कर्मचाऱ्यांनी कामात कोणत्‍याही प्रकारची हयगय केल्‍यास प्रशासकीय कारवाई करण्‍यात येईल. प्रभागातील स्‍वच्‍छतेच्‍या कोणत्‍याही तक्रारी येता कामा नयेत. धुवारणी व फवारणी नियमितपणे करण्‍याचे निर्देश उपायुक्‍तांनी दिले. अतिक्रमणधारकांवर संयुक्‍त कारवाई केली असून, फुटपाथ व नालीवरील अतिक्रमण काढण्‍यात आले. सदर दुकानदाराने फुटपाथवर ठेवलेले साहित्‍य जप्‍त केले. रस्‍त्‍यावरील अतिक्रमणधारकांनी स्‍वत: अतिक्रमण काढण्‍याच्‍या सूचना मनपातर्फे सातत्‍याने देण्‍यात येत आहेत. मात्र त्‍याकडे दुर्लक्ष करून कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण केले जात असल्याने कारवाई करण्‍यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article