आज निवडणूक; मूर्तिजापुरात 390 केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्तात होणार मतदान:मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावावा : निवडणूक अधिकारी संदीप अपार
1 day ago
1
मूर्तिजापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली उमेदवारांची प्रचाराची धामधूम थांबली असून आता चेंडू मतदार राजाच्या कोर्टात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येत असून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी मतदान साहित्यासह मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. मूर्तिजापूर मतदार संघात ३९० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत असून याकरिता एकूण १७३६ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मतदान पथके मतदान साहित्यासह त्यांना नियोजित मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. मूर्तिजापूर मतदार संघात मूर्तिजापूर येथील पंचायत समिती कार्यालयातील मतदान केंद्रावर महिलांद्वारे संचालित सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. श्री गाडगेबाबा विद्यालयात दिव्यांग कर्मचारीद्वारा संचालित दिव्यांग मतदान केंद्र आणि युवा मतदार केंद्र व पंचायत समिती बार्शीटाकळी कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रात आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. याकरिता एकूण २२ मायक्रो ऑब्झर्व्हर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची मतदान केंद्रावर रवानगी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पथके व साहित्य पोहोचवण्याकरता एकूण २१ एस. टी. बस आणि २९ खासगी बस सोबतच १८ जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याकरिता विधानसभा मतदारसंघात ६७ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर सोबत द्यावयाचे सर्व साहित्य योग्यरीत्या तपासणी करून तयार करण्यात आलेले आहे. मंगळवारी तहसील परिसरातील शासकीय धान्य गोदामातून सकाळी ९ वाजता मतदान पथकांना मतदान साहित्याचे वितरण करण्याला सुरुवात करण्यात आली. मतदान पार पडल्यानंतर मतपेट्या व साहित्य याच ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत. याकरिता आवश्यक त्या सर्व आदेश संबंधितांना निर्गमित करण्यात आले आहेत. प्रशासनाने यासाठी कामकाजाची रंगीत तालीम देखील घेतली. पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता प्रशासन दक्ष आहे. निवडणुकीची प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून निःपक्ष व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पं. स. कार्यालयात महिलांद्वारे संचालित सखी मतदान केंद्र निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांना आकर्षित करण्याकरिता पंचायत समिती कार्यालयात महिलांद्वारे संचालित सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. तर श्री गाडगेबाबा विद्यालयात दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी दिव्यांग कर्मचारी यांच्याद्वारे संचालित दिव्यांग मतदान केंद्र असेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)