आता लढयचचं… जयश्रीताई शेळकेंनी व्यक्त केला निर्धार; राज्यातील मोठ्या बचतगट प्रदर्शनीचं आज थाटात उद्घाटन

2 hours ago 1

सरकारने लाडकी बहीण योजना आणली. एकीकडे पंधराशे रुपये हातावर टेकवले मात्र दहा हजाराचे बॅनर लावून जाहिरात बाजी केली. बहिणीला मदत देताना भावाने कधी बॅनर लावल्याचे पाहिले आहे का? असा सवाल उपस्थित करीत ही योजना म्हणजे चार आने की मुर्गी.. बारा आने का मसाला अशी आहे. लोकसभेपासून त्यांना बहिण आठवायला लागली आहे. सरकारचा हिशोब योग्य वेळी चुकता करा, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुलढाण्यात केला. तर लाडकी बहीण योजना आणून एकीकडे योजनेचा उदो उदो केला जात आहे. मात्र दुसरीकडे महागाई वाढवून याच बहिणीला लुबाडण्याचं काम सरकार करीत आहे. महिला या हिशोबी असतात त्यामुळे सरकारला योग्य वेळी हिशोब दाखवा, असे आवाहन खासदार रोहिनी खडसे यांनी केले. तसेच बुलढाणा विधानसभेमध्ये लढणार आणि जिंकणार असा निर्धार जयश्री शेळके यांनी आज व्यक्त केला.

बुलढाणा येथे राज्यातील मोठ्या महिला बचत गट प्रदर्शनीचं उद्घाटन येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी परिसरात पार पडले. यावेळी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने आयोजित महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शन आयोजित केले आहे. मलकापूर रोडवरील रेसिडेन्सीसमोरील मैदानात दुपारी हा कार्यक्रम झाला. उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस हेमलता पाटील अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमल झंवर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव स्वाती वाकेकर, मिनल आंबेकर, वृषाली बोंद्रे, मृणालिनी सपकाळ, महिला उद्योजिका सीताबाई मोहिते, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके, स्वाती कण्हेर यांच्यासह इतर उपस्थित होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारच्या मनमानी कारभार टीकास्त्र सोडले. विशेषतः लाडक्या बहिणी योजनेचा त्यांनी येथेच्च्य समाचार घेतला. कार्यक्रम सुरू होण्याआधी कीर्तनकार प्रविण दवंडे यांनी शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह महामानवांच्या विचारांची पेरणी करत समाजप्रबोधनाचा संदेश दिला. आपल्या विनोदी शैलीत त्यांनी उपस्थितांना हसवले. संचलन वैशाली तायडे यांनी केले.

सरकारला योग्यवेळी हिशोब दाखवा- रोहिनी खडसे

महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपये अनुदान योजनेचा सर्व महिलांनी हक्काने लाभ घ्यावा. ते आपलेच पैसे आहेत. शासन काही घरुन आपल्याला पैसे देत नाही. त्यांनी पंधराशे रुपये दिले जरुर परंतु महागाई सुद्धा वाढवली. तेल, गॅस, किराणा किती रुपयांनी महागला आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे काम सरकारने केले. महिला हिशोबात पक्क्या असतात. त्यामुळे योग्यवेळी सरकारला हिशोब दाखवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिनी खडसे यांनी केले.

इथल्या आमदारावर न बोललेलं बरं

इथल्या आमदारावर बोलून त्याला मोठे करण्याचे काहीच काम नाही. त्यांचे दिवस आता दोन महिन्या पुरते राहिले असल्याचा घणाघात यावेळी सुषमा अंधारे यांनी केला. त्या म्हणाल्या की, बहिणीला मदत करणे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. बहिणीला केलेल्या मदतीची भाऊ कधीच जाहिरातबाजी करीत नाही. मात्र लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देऊन मुख्यमंत्री शिंदे 10 हजार रुपयांचे बॅनर लावतात. ही कुठली मदत आहे. लोकसभा निवडणुकीपासून त्यांना बहीण लाडकी झाली. आधी बहिणींची कधी आठवण झाली नाही. आता विधानसभा निवडणूक असल्याने त्यांचा महिला मतदारांवर डोळा आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. कार्यक्रमाला प्रचंड संख्येने उपस्थित नारीशक्तीचे त्यांनी कौतुक केले. तसेच आगामी काळात खंबीरपणे जयश्री शेळके यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले. आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार हल्ला बोल चढवत येणाऱ्या विधानसभेत बुलढाण्यातून महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

महिलांनो अमिषाला बळी पडू नका..

नारीशक्तिमध्ये प्रचंड ताकद आहे. महिलांनी एखादी गोष्ट ठरवली म्हणजे त्या पूर्ण करतात. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. महिलांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतोय. मात्र हा उत्साह केवळ नऊ दिवसांपुरता मर्यादित ठेवू नका. इथून पुढच्या काळात असाच उत्साह कायम ठेवण्याची साद घालून नारीशक्तीच्या पाठबळाने आता थांबणार नाही तर लढणार अन जिंकणार सुद्धा असा विश्वास व्यक्त करीत दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.

जयश्री शेळके म्हणाल्या, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. मात्र सरकारला याच्याशी काही घेणे देणे नसून त्यांचा हुकूमशाही आणि दडपशाही कारभार सुरू आहे. एकीकडे लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये अनुदानाची योजना सुरू करायची. तर दुसरीकडे महिलांच्या प्रश्नांकडे, सुरक्षीततेकडे कानाडोळा करायचा हा कुठला न्याय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुलढाण्यात महामहिम राज्यपाल आलेले असतांना महिला शिष्टमंडळास त्यांना भेटू दिले जात नाही. दीड तास बाहेर ताटकळत ठेवले जाते यावरुन महिलांबद्दल हे सरकार किती गंभीर आहे याची कल्पना येते. त्यामुळे महिलांनी कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जयश्री शेळके यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article