आव्हान तंत्रस्नेही शिक्षणाचे

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Nov 2024, 11:34 am

Updated on

17 Nov 2024, 11:34 am

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

कार्यकुशल, गुणवान आणि बुद्धिवान विद्यार्थ्यांची पिढी ही राष्ट्राची संपत्ती असते. आज बदलत्या काळात शिक्षक, आई-वडील यांच्याबरोबरीने मोबाईल नावाचा नवा वाटाड्या मुलांच्या आयुष्यात आला आहे. जगातील संशोधने हे सांगता आहेत की, अतिरिक्त प्रमाणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमधील तार्किक क्षमता घटते आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाच्या वापराने मार्क मिळतील, मात्र बौद्धिक विकासाचा आलेख उंचावेल का, हे सांगणे कठीण आहे. आज (17 नोव्हेंबर) जागतिक विद्यार्थी दिन. त्यानिमित्ताने....

17 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन मानला जातो. या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचे कारण 1939 मध्ये चेकोस्लोव्हाकियामधील प्राग विद्यापीठामध्ये नाझी वादळाने विद्यार्थ्यांचे आयुष्य संपवण्यात आले. अर्थात ही घटना दडपशाहीविरुद्धच्या लढ्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. 1941 मध्ये लंडनमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेने अन्यायाविरुद्ध उभे राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये एकता वाढवण्यासाठी 17 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन घोषित केला. गेल्या काही वर्षांमध्ये या दिनाचे निमित्ताने आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्याबरोबर विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठीचा विचार केला जाऊ लागला आहे. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हक्कांचे समर्थन करणे, विद्यार्थ्यांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे यासाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा आहे. सामाजिक आणि राजकीय बदलांमध्ये विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे स्मरण करून देणारा दिवस आहे.

सध्या जगभरात शिक्षण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर वेगाने बदल घडताहेत. काल-परवापर्यंत शिक्षणाचा विचार केला जात असताना राज्य, राष्ट्रापुरता विचार केला जात होता. आता त्या सीमा गळून पडल्या आहेत. शिक्षणाचे स्वरूप आता जागतिक बनते आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी एका देशातून दुसर्‍या देशात जात आहेत. कधीकाळी शिक्षणप्राप्तीचे स्रोत अत्यंत मर्यादित स्वरूपाचे होते. आरंभी केवळ मुखोद्गत असणारे ज्ञान विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवले जात होते. गेल्या काही शतकात शिक्षण प्रक्रियेसाठी पुस्तके केंद्रस्थानी आली. त्या माध्यमातून माहितीची देवाणघेणाव करत शिक्षण सुरू झाले. जगातील विविध विषयांची संशोधने पुस्तकांच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवणे घडू लागले. पुस्तकांची भाषा केंद्रस्थानी आली आणि त्यामुळे माहितीची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण करणार्‍या भाषेला ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले.

पुस्तकांचा अभ्यास म्हणजे ज्ञानाची प्रवासवाट. पुस्तकांचे वाचन म्हणजे अभ्यास आणि तेच शिक्षण असे स्वरूप प्राप्त झाले. आता जगभरात ज्ञानाचे, माहितीचे स्रोत बदलत चालले आहे. इंटरनेट म्हणजेच आंतरजालमुळे विद्यार्थ्यांना हवी ती माहिती क्षणात उपलब्ध होऊ लागली आहे. माहितीचे अनेक स्रोत पडताळून विद्यार्थी त्या माध्यमातून आपली शिक्षणाची वाट चालू पाहताहेत. एकंदरीत काय तर आज शिक्षण जणू माहिती तंत्रज्ञानाशीच नाते सांगू लागले आहेत. असे असले तरी माहिती तंत्रज्ञानाशी नाळ जुळल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास खरंच सुलभ होतो आहे का? आज माहितीचा प्रचंड स्फोट झालेल्या युगात प्रसारणाचा वेगही कल्पनेपलीकडचा आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असला तरी एका क्षणात तुमच्या हाती असलेल्या भ्रमणध्वनीत ती माहिती सहजतेने उपलब्ध होते आहे. आज माहिती मिळवण्याचे आव्हान नाहीच. एखादा विषय आंतरजालाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला तर लाखो पाने उपलब्ध होतात. पण त्यापलीकडे ती माहिती सत्य आहे का, हे पाहण्यासाठी चिकित्सक दृष्टीची गरज निर्माण झाली आहे. आज ही विविध माध्यमे हाती आल्यानंतर विद्यार्थी ज्ञानाची वाट चालणार आहेत का? ही सर्व माध्यमे खरोखर शिक्षण प्राप्त करून देणार आहेत का? की शिक्षणासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत? विद्यार्थ्यांच्या अंगी विद्यार्थी म्हणून कोणते गुण असावेत याचा विचार यापूर्वी अनेकदा केला गेला. विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ते रुजवण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र नव्याने माहितीची आणि साधनांची भर पडत गेली, त्याप्रमाणे शिक्षणासमोर नवी आव्हाने उभी ठाकू लागली आहेत.

शिक्षणातून माणूस अधिक विवेकी, शहाणा बनतो असे मानले जाते. माणसाला तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता शिक्षणातून निर्माण करण्याची गरज असते. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशातील शिक्षण व्यवस्थेतून हे फलित अपेक्षित आहे. आज जगाच्या पाठीवर प्रत्येक नागरिक हा केवळ स्वतःच्या राष्ट्रापुरता मर्यादित नागरिक नाही, तर तो आता जागतिक नागरिकत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे शिक्षणातून जसे देशासमोरील प्रश्नांचे निराकरण अपेक्षित होते, त्याप्रमाणे आता जगासमोरील प्रश्नांचे निराकरण करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे शिक्षणातून तो विचारच विद्यार्थ्यांच्या मस्तकी रुजवला जाण्याची नितांत गरज आहे.

कालपरवापर्यंत ग्रंथालय, पुस्तके, तज्ज्ञांशी चर्चा, विविध स्वरूपाची व्याख्यानांभोवती दिसणारा विद्यार्थी आता नव्या ज्ञानस्रोतांशी जोडला जाऊ लागला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने ज्ञान, माहिती जगभरात सहजतेने पोहोचवणे सहज सुलभ झाले आहे. सध्या घराघरात भ्रमणध्वनी, आंतरजाल आणि त्या माध्यमातून सहजतेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होईल अशा प्रकारचे तंत्रज्ञान हाती आले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण प्रक्रियेतही होऊ लागला आहे. अर्थात जगात नवे काही आले की, त्याचा स्वीकार करणे अपरिहार्यच असते. नव्या तंत्रज्ञानामुळे लाखो पानांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा ज्ञानाचा खजिना सहजतेने उपलब्ध होऊ लागला आहे. जगभरातील पुस्तके सहजतेने मिळू लागली आहेत. आता माहिती संकलनाचे आव्हान नाही तर त्या माहितीचे विश्लेषण, चिकित्सकतेने जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुळात ही साधने वापरणे हे वर्तमानात आव्हानात्मक नाहीयेच. विद्यार्थी सहजतेने ते वापरताहेत. पण या तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान मिळवणे, अभ्यासासाठी होण्याऐवजी परीक्षेत कॉपी करण्यासाठी किंवा वर्गातील गृहपाठ, प्रात्यक्षिक कार्यासाठी तयार उत्तरे मिळवण्यासाठी अधिक होऊ लागला आहे. अगदी इंजिनिअरिंगचे विद्यार्थीदेखील आज एआयच्या माध्यमातून प्रोजेक्ट सादर करत आहेत. अभ्यास करण्याऐवजी चॅटजीपीटीच्या माध्यमातून तयार उत्तरे शोधून ती नोंदवण्यात विद्यार्थी आघाडी घेताहेत. ही बाब धोक्याची आणि चिंतेची आहे.

मुळात विद्यार्थी हा ज्ञानपरायण असायला हवा आणि ज्ञान हे सेवापरायण असायला हवे असे म्हटले जाते. ज्ञानासाठी साधनेची वाट हवी. पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थी कितीतरी मोठ्या प्रमाणात संघर्ष करत होते. तासन्तास ग्रंथालयात बैठक मारणे, तज्ज्ञांशी चर्चा करणे, विविध स्त्रोतांमधून ज्ञानापर्यंत पोहचणे घडत होते. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे वाचन, चिंतन, मनन घडत होते. शिक्षणातून विद्यार्थी घडवण्याची ती वाट होती. आज नवतंत्रज्ञानाचा उपयोग करत तयार उत्तरेच मिळू लागल्याने वाचणे,अभ्यास करणे, शोधणे, चिंतन-मनन करणे या शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या पायर्‍या थेट वगळल्या जात आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेवर, आकलनक्षमतेवर, ज्ञानसंपादनाच्या उपजत नैसर्गिक गुणवैशिष्ट्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. राज्य सरकारच्या वतीने गेले काही वर्षापासून पॅटची परीक्षा घेतली जात आहे. त्या प्रश्नपत्रिका सरकार शाळांपर्यंत पोहचवते आहे. मात्र त्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विविध समाजमाध्यमातून प्रसारित होताहेत. अधिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या प्रश्नांची तयार उत्तरे मिळून देण्याची व्यवस्था आंतरजालच्या मदतीने सहज उपलब्ध आहे. यातून विद्यार्थी मार्क मिळवतील पण त्या शिक्षणातून परीवर्तनाची वाट कशी चालणार ? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये प्रोफेसर यशपाल यांनी म्हटले होते की,आज उपलब्ध असणार्‍या माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग शिक्षणात करायचा असेल तर सध्या कार्यरत असणार्‍या शिक्षकांपेक्षा अधिक गुणवत्तेच्या शिक्षकांची गरज असणार आहे.

मुळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हाती असणारे हे दुहेरी शस्त्र आहे. या शस्त्राच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपुढे नेमके काय वाढून ठेवत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. शिक्षणात कस लावणारी प्रक्रिया नवतंत्रज्ञानाने सुलभ करुन दिल्यामुळे अभ्यासाची वृत्ती कमी होते आहे. जगातील संशोधने हे सांगता आहेत की, अतिरिक्त प्रमाणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमधील तार्किक क्षमता घटते आहे. म्हणजेच, तंत्रज्ञानाच्या वापराने मार्क मिळतील मात्र, बौध्दिक विकासाचा आलेख उंचावेल का, हे सांगणे कठीण आहे. तंत्रज्ञानाचे फायदे लाख असले तरी त्यामुळे माणसाचे अवलंबित्व वाढते, ही वस्तुस्थिती आहे. मोबाईल फोन येण्यापूर्वी असंख्य लोकांना 30-40 जणांचे फोन नंबर तोंडपाठ असायचे. आज असे किती जण आपल्याला दिसतात? तंत्रज्ञानावरचे हे अवलंबित्व किती धोकादायक ठरू शकते, हे मध्यंतरी मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 प्रकरणावरुन जगाने पाहिले आहे. अशा स्थितीत एआय, अ‍ॅलेक्सा, चॅटजीपीटी यांचा अधिकाधिक वापर करण्यात तरबेज असणार्‍या मुलाविषयी अभिमान बाळगायचा की, पाठ्यपुस्तकांच्या आधारे, इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्वयंअध्ययन करुन स्वतःच्या बौद्धिक क्षमतेने उत्तरे देणारा विद्यार्थी सरस मानायचा याचा विचार पालकांनी करायला हवा.

एक मुलभूत गोष्ट कधीही विसरता कामा नये की, शिक्षण म्हणजे केवळ माहिती नाही तर विचारांची दृष्टी देणे आहे. शिक्षणातून मूल्यांची पेरणी जशी आवश्यक आहे त्याप्रमाणे अलिकडच्या कालखंडात माहिती तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने नवमूल्य,तंत्रज्ञानाशी संबंधित शिष्टांचाराचा विचारही रूजवावा लागणार आहे. यासाठी शिक्षकांना देखील ही साधने वापरणे आणि त्यासंबंधीच्या अध्यापनशास्त्राचा विचार करावा लागणार आहे. स्क्रिन टाईम आणि अध्ययन या संशोधनाचाही विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान वापराबाबत समूपदेशन करण्याची गरज आहे. विद्यार्थी म्हणून निरंतर अध्ययनाची साधना आणि समग्र विकासाची वाट कधीच हरवता कामा नये हाच आजच्या विद्यार्थी दिनानिमित्तचा आपला संकल्प असायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article