बाळासाहेब थोरातFile photo
Published on
:
01 Feb 2025, 6:28 am
Updated on
:
01 Feb 2025, 6:28 am
संगमनेर : आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार आहे. जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, याबाबत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना पत्र दिले आहेत.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये याबाबत मोठी संतापाची लाट उसळली आहे. याबाबत विविध गावांमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करावा, अशीी मागणी केली. यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
याचसोबत माजी मंत्री थोरात यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या चुकीच्या प्रस्तावाबाबत पत्र लिहिले आहे. आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संगमनेर यांनी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही. या प्रस्तावामुळे जनतेची सोय होण्यापेक्षा गैरसोय अधिक होणार आहे. असे दिसते संगमनेर शहरालगाच्या गावांना देखील या प्रस्तावानुसार आश्वी बुद्रुक या प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालया जोडले आहे. भौगोलिक परिस्थिती, महसुली मंडळाची सोय अशा कोणत्याच बाबींचा या प्रस्ताव तयार करताना विचार केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे यातील अनेक गावांना प्रास्तावित आश्वी येथील कार्यालयात जाण्यासाठी संगमनेर वरूनच जावे लागते आहे. ही बाब अत्यंत गंभीर व प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची आहे.
या प्रस्तावामुळे तालुक्याच्या एकता आणि अखंडतेला धक्का लागला आहे. तरी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी आपल्या स्तरावरून या गंभीर बाबीची दखल घेऊन महसूल विभागाने काढलेला हा चुकीचा प्रस्ताव रद्द करून तातडीने फेरविचार करण्यासंबंधी कळवावे, असे पत्रात म्हटले आहे.