Published on
:
18 Nov 2024, 10:23 am
Updated on
:
18 Nov 2024, 10:23 am
तेहरान : वृत्तसंस्था
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खोमेनी यांनी आपला दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मुजतबा खोमेनी यास आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. पण, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही. ८५ वर्षीय खोमेनी आजारी आहेत. अशातच त्यांनी आपल्या मृत्यूच्यापूर्वी शांततामय मागनि आपले अधिकार आपल्या मुलाकडे सोपविले सांगण्यात येत आहे.
इराणच्या संसदेने २६ सप्टेंबर रोजी आपल्या नवीन सर्वोच्च नेत्याची निवड केली होती. स्वतः खोमेनी यांनी संसदेच्या ६० सदस्यांना बोलावून गुप्तपणे आपला उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली होती.
मुजतबा यांना सर्वोच्च नेतेपदी निवडण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू होती. त्यामुळे इराण सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मुजतबा यांचा वाटा मोठा होता. यापूर्वी मुजतबा यांनी इराणचे कोणतेही महत्त्वाचे पद भूषविलेले नाही, हे विशेष! मुस्तफा हा खोमेनी यांचा मोठा मुलगा आहे. त्याला त्यांनी आपला उत्तराधिकारी का बनविले नाही हे मात्र समोर आलेले नाही.
मुजतबा हे एक रहस्यमय व्यक्ती आहेत. ते खूपच कमी बाहेर दिसतात आणि ते कधीच आपल्या वडिलांप्रमाणे सार्वजनिकरीत्या भाषण देत नाहीत, तरीही त्यांचा देशात दबदबा आहे. इराणची गुप्तचर यंत्रणा आणि सरकारी यंत्रणेत मुजतबा यांचे जवळचे लोक कार्यरत आहेत.
यापूर्वी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी इब्राहिम रईसी यांच्या निवडीनंतर मुजतबा यांची प्रतिष्ठा खूपच वाढली. रईसी यांच्यानंतर त्यांनाच इराणच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी तयार केले जात होते; पण रईसी यांच्या मृत्यूनंतर सर्व काही बदलले आहे. आयातुल्लाह ही एक धर्मगुरूची पदवी आहे; पण इस्लामी कायद्यानुसार सर्वोच्च नेता होण्यासाठी आयातुल्लाह असणे गरजेचे नाही. पण, खोमेनी यांना सर्वोच्चपदी निवडण्यासाठी इराणच्या कायद्यात दुरुस्ती केली होती.