Published on
:
20 Nov 2024, 11:45 pm
Updated on
:
20 Nov 2024, 11:45 pm
आपल्या राज्याच्या विधानसभेचे महामतदान बुधवारी एकदाचे पार पडले. सर्वात आधी महाकाय निवडणूक यंत्रणा राबविणार्या सर्व कर्मचार्यांचे अभिनंदन. कडाडत्या थंडीत मुक्कामी मतदान केंद्रावर जाणे आणि आयोगाने दिलेले कर्तव्य पार पडणे याचा प्रचंड ताण या यंत्रणेवर असतो. मतदान झाल्यानंतर आपण आपल्या घरी जातो. परंतु केंद्रावरील सर्व मतदान संपल्यानंतर मतपेट्या जबाबदारीने परत करणे आणि त्यानंतरच घर गाठणे ही एक मोठीच अवघड अशी कामगिरी निवडणूक कर्मचार्यांना असते. सुरळीत मतदान पार पडले आणि सर्व रेकॉर्ड परत केले की, ते निर्धास्त होऊन घरी जातात.
यावर्षीच्या विधानसभा निवडणुका थोड्याशा वेगळ्या अशा अर्थाने वाटल्या की, राज्यात जागोजागी डोके फोडाफोडी झाली. पूर्वी प्रत्यक्ष मारहाण करणे, डोके फोडणे वगैरे प्रकार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये होत असत. परंतु त्याची लागण विधानसभा इलेक्शनमध्ये व्हावी हे काही चांगले लक्षण नाही. कार्यकर्ते पेटलेले असतात. शब्दाला शब्द लागतो आणि मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावर येते, असे बर्याच ठिकाणी दिसून आले आहे. सरकारे येतात आणि जातात. परंतु स्थानिक पातळीवर आपले संबंध सगळ्यांशी स्नेहाचे असले पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असते. एक मात्र निश्चित की, यावर्षी निवडणुका अत्यंत चुरशीने लढवल्या गेल्या आणि त्यामुळेच मतदानाचा टक्काही वाढला असण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्था मतदानाचा आग्रह करत होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे हे पाहून राज्यभरातील आपल्यासारख्या सामान्य जनतेला खूप आनंद झाला आहे. मतदार जेव्हा उत्साहाने मतदानाला येतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या प्रगतीची उमेद असते. आपल्यासाठी काहीतरी चांगले होईल ही आशा घेऊन त्याचा उत्साह वाढलेला असतो हे चांगले लक्षण म्हणावे लागेल.
वयोवृद्ध लोकांच्या घरी येऊन मतदान करून घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येत होते तेव्हा तरुणांनी त्यांना प्राधान्याने पुढे येण्यास सांगितले हे द़ृश्य सुखावणारे होते. ही महाराष्ट्राची खरी परंपरा आहे. नवीन पिढी तत्परतेने ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी मदत करत होती, हे दृश्य असंख्य लोकांना समाधान देऊन गेले. उमेदवारांनी प्रचाराचे काम केले होते. आता मतदारांनी मतदानाचे काम केले आहे. आता उत्कंठा आणि हुरहूर आहे ती केवळ 23 तारखेला कोण निवडून येणार याची. निवडून कोणीही येवो आणि सरकार कोणाचेही येवो, परंतु भरपूर मतदान झाल्यामुळे आपल्या देशातील लोकशाही मात्र निश्चित बळकट झाली आहे. हुकूमशाही, एकपक्षीय एकाधिकारशाही असलेले देश जगभरात पराभूत होत असताना आपल्या देशाची लोकशाही मात्र बळकट होणे ही महत्त्वाची सुवार्ता म्हणावी लागेल. तदानोत्तर चाचण्यांचे कलपण लगेच येण्यास सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान चाचण्यांचा कल हा फारसा विश्वासार्ह नाही असे दिसून आले आहे. प्रत्यक्ष मतदानाचे आकडे येईपर्यंत टीव्ही न्यूज चॅनलना त्यामुळे भरपूर खाद्य मिळते या पलीकडे त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही.