Published on
:
29 Nov 2024, 12:25 am
Updated on
:
29 Nov 2024, 12:25 am
सोलापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे शेतकरी आता आपला ऊस कारखान्यांस घालण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील 34 साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. 125 लाख मेट्रीक टन क्षेत्रावरील ऊसाचे गाळप होणार आहे.
गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. निकालानंतर निवडणुकीचे वातावरण शांत होऊ लागले आहे. शेतकरी शिवारातील ऊस लवकरात लवकर साखर कारखान्यास घालण्यासाठी खटाटोप करत आहेत. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे ऊस गाळाप हंगाम उशिराने सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर जावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, जिल्ह्यात ऊस टोळ्यांची संख्या कमी असल्याने अनेक शेतकर्यांना वेळेवर ऊस तोडणारी टोळी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी ऊसटोळी, कारखान्यांकडे फेर्या मारत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील बर्याच साखर कारखान्यांकडे ऊस टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्यांनी विविध गावात जाऊन ऊस तोडणी सुरु केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या अद्यापही दाखल होत आहेत.
ऊस गाळपासाठी परवाना मागितलेले जिल्ह्यातील 34 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम सुरु केला आहे. जिल्ह्यात 125 लाख मेट्रीक टन ऊसाचे क्षेत्र असल्याने यंदाचा गाळप हंगाम शंभर दिवसांपेक्षा जास्त चालेल.
-पांडुरंग साठे, प्रादेशिक उप संचालक, साखर कार्यालय, सोलापूर